सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : विदर्भातील मूतखड्याचे रुग्ण अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:20 PM2019-05-03T23:20:44+5:302019-05-03T23:21:44+5:30
मूत्राशयातील खड्याचे तुकडे करणारे यंत्र ‘लिथोट्रिप्सी’ विदर्भात केवळ ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्येच आहे. विना शस्त्रक्रिया होणारी ही उपचार पद्धती खासगी इस्पितळात महागडी आहे. यामुळे मूतखड्याने त्रस्त असलेले मोठ्या संख्येत रुग्ण ‘सुपर’ला येतात. वर्षभरात ७०० वर रुग्णांवर हा उपचार केला जातो. परंतु १५ वर्षे जुने, कालबाह्य झालेले ‘लिथोट्रिप्सी’ यंत्र शुक्रवारी पुन्हा बंद पडले. यामुळे गाव-खेड्यातून येणाऱ्या रुग्णांना आता असह्य दुखणे सहन करीत यंत्र दुरुस्त होण्याच्या प्रतीक्षेत दिवस काढावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मूत्राशयातील खड्याचे तुकडे करणारे यंत्र ‘लिथोट्रिप्सी’ विदर्भात केवळ ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्येच आहे. विना शस्त्रक्रिया होणारी ही उपचार पद्धती खासगी इस्पितळात महागडी आहे. यामुळे मूतखड्याने त्रस्त असलेले मोठ्या संख्येत रुग्ण ‘सुपर’ला येतात. वर्षभरात ७०० वर रुग्णांवर हा उपचार केला जातो. परंतु १५ वर्षे जुने, कालबाह्य झालेले ‘लिथोट्रिप्सी’ यंत्र शुक्रवारी पुन्हा बंद पडले. यामुळे गाव-खेड्यातून येणाऱ्या रुग्णांना आता असह्य दुखणे सहन करीत यंत्र दुरुस्त होण्याच्या प्रतीक्षेत दिवस काढावे लागणार आहे.
विदर्भात गरम वातावरणाच्या शहरांमध्ये जिथे घाम जास्त जातो, तिथे पाणी कमी पिणाऱ्यांना ‘किडनी स्टोन’ म्हणजे मूतखडा होण्याचा धोका वाढतो. विशेषत: उन्हाळ्यात अशा रुग्णांची संख्या वाढते. मूत्राशयातील खडा हजारपेक्षा कमी घनेतेचा आणि दीड सेंटीमीटरपेक्षा कमी रुंदीचा असेल तर ‘एक्स्ट्रा कॉर्पोरिअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी’ यंत्रामुळे शस्त्रक्रिया टाळणे शक्य होते. या यंत्राच्या साहाय्याने लेझरद्वारे किडनीतील मूतखडे खसखशीच्या दाण्यांसारखे फोडले जातात. नंतर ते लघुशंकेद्वारे बाहेर फेकले जातात. २००४ मध्ये शासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या यूरोलॉजी विभागाला १ कोटी ५५ लाखाचे हे यंत्र उपलब्ध करून दिले. या यंत्राद्वारे दरवर्षी ६०० ते ७०० रुग्णांवर यशस्वी उपचार होतात. परंतु ‘डॉर्निअर डेल्टा १’ हे यंत्र आता कालबाह्य झाले आहे. संबंधित कंपनीने याची माहिती रुग्णालयाला दिली आहे. कंपनीने यंत्राचे ‘पार्ट’ तयार करणे बंद केल्याचेही सांगितले आहे. तरीही लाखो रुपये खर्च करून हे यंत्र दुरुस्त केले जात आहे. विशेष म्हणजे, चार कोटीचे नवे यंत्र खरेदीचा प्रस्ताव तत्कालीन विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार असताना, माजी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्यामार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तेथून हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे गेला. त्यांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आला. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळालेली नाही. आता पुन्हा यंत्र बंद पडल्याने नवे यंत्र खरेदीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. रुग्णांची संख्या पाहता वैद्यकीय शिक्षण विभागाने याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.
दुरुस्तीसाठी लागतात चार-पाच लाख
‘लिथोट्रिप्सी’ यंत्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. दुरुस्तीवर चार ते पाच लाखांचा खर्च होतो. परंतु कालबाह्य झालेल्या यंत्रावर लाखो रुपयांचा खर्च करण्यापेक्षा नवे अद्ययावत ‘डॉर्निअर डेल्टा-२’ यंत्र खरेदी केल्यास याचा फायदा रुग्णांसोबतच प्रशासनाला होईल, असे बोलले जात आहे.