सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ; रक्त घटक आणल्यावरच शस्त्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 10:57 AM2021-07-05T10:57:16+5:302021-07-05T10:58:01+5:30

Nagpur News सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय, मेंदू व युरोलॉजीशी संबंधित महत्त्वाचा शस्त्रक्रिया व मागील पाच वर्षांपासून मूत्रपिंड प्रत्यारोपण होत असतानाही येथील रक्तपेढीत रक्त घटक वेगळे करणारी यंत्रणा ‘ब्लड कॉम्पोनेंट सेप्रेटर’च नाही.

Super Specialty Hospital; Surgery only after bringing blood components! | सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ; रक्त घटक आणल्यावरच शस्त्रक्रिया!

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ; रक्त घटक आणल्यावरच शस्त्रक्रिया!

Next
ठळक मुद्दे न्यायालयाच्या आदेशानंतरही रक्तपेढीत ‘ब्लड कॉम्पोनेंट सेप्रेटर’चा अभाव

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय, मेंदू व युरोलॉजीशी संबंधित महत्त्वाचा शस्त्रक्रिया व मागील पाच वर्षांपासून मूत्रपिंड प्रत्यारोपण होत असतानाही येथील रक्तपेढीत रक्त घटक वेगळे करणारी यंत्रणा ‘ब्लड कॉम्पोनेंट सेप्रेटर’च नाही. रक्तघटक आणल्यावरच शस्त्रक्रिया होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांवर ऐनवेळी धावाधाव करण्याची वेळ येते. विशेष म्हणजे, २०१६ मध्ये एका दिवाणी अर्जावर न्यायालयाने रक्तपेढीत आवश्यक यंत्रणा उभी करण्याचे आदेश दिले होते. त्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मेडिकलने शपथपत्र दिले. परंतु चार वर्षांचा कालावधी होऊनही ना रक्तपेढीचे बांधकाम झाले, ना मनुष्यबळ मिळाले, ना यंत्र.

मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयविकार विभाग, हृदय शल्यक्रिया विभाग, मेंदूरोग विभाग, मेंदू शल्यक्रिया विभाग, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभाग, युरोलॉजी विभाग, नेफ्रोलॉजी विभाग व इण्डोक्राईन असे आठ विभाग आहेत. श्वसनरोग विभागाचाही वॉर्डही या हॉस्पिटलमध्ये आहे. हृदय, मेंदू, मूत्रपिंडाशी संबंधित रोजच शस्त्रक्रिया होतात. शिवाय, ७०वर मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले आहे. यामुळे विदर्भच नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगड येथून रुग्ण येतात. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना अद्ययावत रक्तपेढीअभावी रुग्णसेवा अडचणीत आली आहे. रुग्णाचा नातेवाइकाला आवश्यक रक्तघटकासाठी मेडिकल किंवा खासगीमध्ये चकरा मारण्याची वेळ येत आहे.

-शपथपत्र सादर करून वेळ मारून नेली!

‘सुपर’च्या रक्तपेढीतील सुविधांच्या त्रुटींकडे लक्ष वेधण्यासाठी २०१६ मध्ये दिवाणी अर्ज सादर केला होता. यावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने रक्तपेढी २४ तास सुरू ठेवण्याची व ‘ब्लड कॉम्पोनेंट सेप्रेटर’ यंत्र उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मेडिकलचा अधिष्ठात्यांनी रक्तपेढीच्या नूतनीकरणासाठी ३९.८० लाख, उपकरणासाठी ८० लाख व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे शपथपत्र सादर केले. परंतु पुढे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून हा निधीच मिळाला नाही. यामुळे न्यायालयात शपथपत्र सादर करून केवळ मारून नेण्याचा हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे.

-एका रक्ताच्या पिशवीतून तीन रुग्णांचा जीव वाचविणे शक्य

एका रक्ताच्या पिशवीपासून (होल ब्लड) तीन रक्तघटक (ब्लड कॉम्पोनंट) म्हणजे, ‘प्लाझ्मा’, ‘प्लेटलेट्स’ व ‘पॅक्ड रेड ब्लड सेल्स’ तयार करता येतात. एका रक्तदात्याने दिलेल्या रक्ताचा उपयोग तीन रुग्णांना होऊन त्यांचा जीव वाचविला जाऊ शकतो. परंतु मध्य भारतातील पहिल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘ब्लड कॉम्पोनेंट सेप्रेटर’च नसल्याने नियमाचा भंग करून रुग्णांना ‘होल ब्लड’ दिले जात आहे.

-‘ओएसडी’ रक्तपेढीचे प्राध्यापक

एका प्रकरणावरील न्यायालयाच्या आदेशावरून वैद्यकीय शिक्षण विभागाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) पद निर्माण केले. परंतु पाच वर्षे होऊन आजही येथील ‘ओएसडी’ला रक्तपेढीचे प्राध्यापक दाखवून वेतन काढले जात आहे. रक्तपेढीचा विकास मात्र रखडला आहे.

Web Title: Super Specialty Hospital; Surgery only after bringing blood components!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.