‘त्या’ काळातील रुग्णांची काळजी घेणार ‘सुपर’
By admin | Published: March 27, 2017 02:23 AM2017-03-27T02:23:20+5:302017-03-27T02:23:20+5:30
मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता फार आवश्यक असते. परंतु अनेक गरीब महिला रुग्णांना ‘सॅनिटरी पॅड’चा खर्च परडवत नाही.
रुग्णालयात लागणार ‘सॅनिटरी पॅड वेंडिग मशीन’: राज्यातील पहिलाच प्रयोग
सुमेध वाघमारे नागपूर
मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता फार आवश्यक असते. परंतु अनेक गरीब महिला रुग्णांना ‘सॅनिटरी पॅड’चा खर्च परडवत नाही. विशेषत: शासकीय रुग्णालयात उपचार घेताना अशा काळात अनेक महिला रुग्णांना अडचणींना सामोर जावे लागते. याची दखल नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने घेऊन १० ‘सॅनिटरी पॅड वेंडिग मशीन’ खरेदी केल्या आहेत. महिला रुग्णांसाठी मोफत ‘सॅनिटरी पॅड’ उपलब्ध करून देणारे राज्यातील हे पहिले रुग्णालय ठरले आहे.
भारतात ८८ टक्के स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी जुने कपडे, काहीवेळा वर्तमानपत्र अशांसारख्या साधनांचा उपयोग करतात. परिणामी जवळजवळ ७० टक्के स्त्रियांना जननसंस्थेमध्ये संसर्ग होऊन त्यासंबंधीच्या रोगांना सामोरे जावे लागते. शिवाय हा विषय अत्यंत खासगी असल्याने त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळली जाते. विशेष म्हणजे रुग्ण असतानाही संकोचामुळे या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे आजार आणखी गंभीर होण्याची शक्यता राहते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे ८० टक्के रुग्ण हे दारिद्र्यरेषेखालील असतात. यामुळे महिला रुग्णांना डॉक्टरांनी ‘सॅनिटरी पॅड’ वापरण्याची सूचना केली तरी पैशांअभावी ‘पॅड’ वापरले जात नाही. याची दखल रुग्णालय प्रशासनाने घेतली. रुग्णांच्या सोयीसाठी ‘सॅनिटरी पॅड वेंडिग मशीन’ उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने आमदार गिरीश व्यास यांना विनंती केली. आ. व्यास यांनी या मागणीला गंभीरतेने घेत निधी उपलब्ध करून दिला. यामुळे दहा ‘सॅनिटरी पॅड वेंडिग मशीन’ विकत घेण्यात आल्या. नुकत्याच या मशीन रुग्णालात उपलब्ध झाल्या असून मशीनमुळे महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.
दहा स्वच्छतागृहात लागणार ‘वेंडिग मशीन’
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या महिलांच्या दहा स्वच्छता गृहात हे ‘वेंडिग मशीन’ लागणार आहेत. एका यंत्राची किमत २२ हजार रुपये आहे. या मशीनसोबत वापरलेले ‘सॅनिटरी पॅड’ जाळण्याचे यंत्रही उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे वापरलेल्या पॅडचा कचरा कुठेही दिसणार नाही.
ग्रामीण भागात राबविण्यासाठी प्रयत्न
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पुढाकारामुळेच हा स्तुत्य उपक्रम हाती घेणे शक्य झाले आहे. आमदार निधीतून दहा ‘सॅनिटरी पॅड वेंडिग मशीन’ खरेदी करण्यात आले आहेत. याचा फायदा रुग्णालयातील रुग्णांना होईल. महिलांच्या आरोग्याशी निगडित असलेला या उपक्रमाची ग्रामीण भागात फार गरज आहे. यासाठी प्रयत्न केले जातील.
-आ. गिरीश व्यास