‘सुपर’ होणार आणखी सुपरफास्ट
By admin | Published: May 25, 2016 02:36 AM2016-05-25T02:36:13+5:302016-05-25T02:36:13+5:30
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदभरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य सचिवांनी तातडीने बैठक बोलवत मंजूर पदांना तडकाफडकी प्रशासकीय मान्यता दिली.
१६५ पदांना मान्यता : ३ प्राध्यापकांसह २७ निवासी डॉक्टरांचा समावेश
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदभरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य सचिवांनी तातडीने बैठक बोलवत मंजूर पदांना तडकाफडकी प्रशासकीय मान्यता दिली. विशेष म्हणजे ‘सुपर’ला लॉटरी लागली असून १६५ पदांना मान्यता मिळाली आहे. यात ३ प्राध्यापकांसह २७ निवासी डॉक्टरांचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये चांगल्या दर्जाची सेवा मिळत असल्याने रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु त्या तुलनेत मंजूर असलेली ३६७ पदे कमी पडत आहे. रुग्णसंख्या पाहता विविध ७५८ पदांची आवश्यकता आहे. ३९१ पदांची कमतरता भासत आहे, परिणामी रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यामुळे ‘सुपर’ भारतीय वैद्यक परिषदेच्या निकषास पात्र ठरत नाही. यातून पदव्युत्तर शाखेचे अनेक अभ्यासक्रम देखील रेंगाळले आहेत. ही पदे भरली जात नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देताना खंडपीठाने ही पदे तीन महिन्यांत भरण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) दिले होते. यावर डीएमईआरने खंडपीठाला शपथपत्रही सादर केले. परंतु याची मुदत येऊनही पदे भरली गेली नाहीत. यामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका पुन्हा खंडपीठासमक्ष आली. त्यावर सुनावणी देताना खंडपीठाने मुख्य सचिवांसह, संचालकांनाही नोटीस बजावली होती. हा न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने यावर तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी शुक्रवारी बैठक बोलावली होती. त्यात ‘सुपर’साठी १६५ पदांना प्रशासकीय मान्यता तडकाफडकी प्रदान केली. आर्थिक तरतुदीसाठी ही पदे आता आगामी जुलैत होणाऱ्या मंत्रिमंडळापुढे सादर होणार आहेत. (प्रतिनिधी)
या पदांना मिळाली मान्यता
यूरोलॉजी, एन्डोक्रेनोलॉजी व पॅथालॉजी विभागाला प्रत्येक एक प्राध्यापकाच्या पदाला मान्यता मिळाली आहे. न्यूरोलॉजी, सीव्हीटीएस, न्यूरोसर्जरी, एन्डोक्रेनोलॉजी, हॉस्पिटल अॅडमिनीस्ट्रेशनमध्ये प्रत्येकी एक सहायक प्राध्यापकासह १२ लेक्चर्स मिळाले आहेत. यात सीव्हीटीएस विभागाला दोन, न्यूरोलॉजीला एक, युरोलॉजीला एक, एन्ड्रोक्रनोलॉजीला दोन, अॅनेस्थेशियाला तीन आणि हॉस्पिटल अॅडमिनीस्ट्रेशनला दोन लेक्चर मिळाले आहेत. या शिवाय १०९ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदांना मान्यता देण्यात आली.
एन्डोक्रेनोलॉजी आणि न्यूरॉलॉजीचा विभाग सुरू होणार
सुपरमध्ये एन्डोक्रेनोलॉजी आणि न्यूरॉलॉजीची पदे भरली जात नसल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमात अडथळा निर्माण झाला होता. आता या दोन्ही विभागात प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, लेक्चर यांच्यासह वॉर्ड मंजूर झाल्याने या विभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.