सुपरची ‘अॅन्जिओग्राफी’ थांबली
By admin | Published: August 5, 2016 03:04 AM2016-08-05T03:04:57+5:302016-08-05T03:04:57+5:30
गरिबांच्या हृदयावर वरदान ठरलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात ‘डाय’चा तुटवडा पडल्याने ‘अॅन्जिओग्राफी’ थांबली आहे.
‘डाय’चा तुटवडा : पुरवठादाराने आवश्यक कागदपत्राचे कारण केले पुढे
नागपूर : गरिबांच्या हृदयावर वरदान ठरलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात ‘डाय’चा तुटवडा पडल्याने ‘अॅन्जिओग्राफी’ थांबली आहे. चार दिवसानंतरही ‘डाय’ न मिळाल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत. संबंधित पुरवठादाराला रुग्णालय प्रशासनाकडून आवश्यक कागदपत्र उपलब्ध न झाल्याने त्याने हा पुरवठा थांबविल्याची माहिती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल)संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीत बदल होत आहे. परिणामी, दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी वाढत आहे. विशेषत: हृदय रोग विभागात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या विभागात नवीन ‘विप्रो जीई-कॅथलॅब’ आहे. या यंत्रामुळे दिवसभरात २० च्यावर अॅन्जिओग्राफी तर चार-पाच अॅन्जिओप्लास्टी होते. हृदयावर अॅन्जिओग्राफी करण्यापूर्वी आवश्यक असणारे द्रव्य (डाय) इंजेक्शनद्वारे दिले जाते. नेमका याच द्रव्याचा तुटवडा पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विभागाने एक महिन्यापूर्वीच पुरवठादाराला ‘डाय’ची मागणी केली होती. परंतु पुरवठादाराने साहित्य खरेदीसाठी आवश्यक असलेल्या रुग्णालयाचा ‘पॅन क्रमांक’ मागितला. परंतु रुग्णालयाच्या नावाचे ‘पॅन’च नाही. यामुळे खरेदीत उशीर झाल्याने गेल्या चार दिवसांपासून अॅन्जिओग्राफी बंद पडली. याचा फटका मात्र रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बसतो आहे. रेडिओलॉजी विभागातही डायची गरज भासते. सिटी स्कॅन, सोनोग्राफी तसेच एमआरआय करण्यापूर्वी डायची गरज असते. परंतु येथे ते रुग्णांनाच विकत आणावे लागत असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘डाय’चा तुटवडा पडल्याने अॅन्जिओग्राफी बंद आहे. संबंधित पुरवठादाराने पहिल्यांदाच ‘पॅन क्रमांक’ मागितल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. दोन्ही रुग्णालयाचे ‘पॅन’ काढण्यासाठी वेगाने कारवाई सुरू आहे. या संदर्भातील माहिती पुरवठादाराला देण्यात आली आहे. त्याने साठा रवाना केला असून लवकरच तो रुग्णालयात उपलब्ध होणार आहे.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल