अवयव दानाच्या सुविधांची मेडिकलमध्ये पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:01 AM2018-05-16T01:01:17+5:302018-05-16T01:01:35+5:30
उपराजधानीत गेल्या सहा वर्षात टप्प्याटप्प्याने अवयव दानाचा आकडा वाढत असलातरी हव्या त्या प्रमाणात अवयव दान होत नसल्याचे वास्तव आहे. ही संख्या वाढण्यासाठी व गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ‘मोहन फाऊंडेशन’ व टाटा ट्रस्टच्यावतीने मंगळवारी मेडिकलची पाहणी करण्यात आली. यावेळी सोई व समस्यांची माहिती घेण्यात आली असून या संदर्भातील अहवाल लवकरच शासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत गेल्या सहा वर्षात टप्प्याटप्प्याने अवयव दानाचा आकडा वाढत असलातरी हव्या त्या प्रमाणात अवयव दान होत नसल्याचे वास्तव आहे. ही संख्या वाढण्यासाठी व गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ‘मोहन फाऊंडेशन’ व टाटा ट्रस्टच्यावतीने मंगळवारी मेडिकलची पाहणी करण्यात आली. यावेळी सोई व समस्यांची माहिती घेण्यात आली असून या संदर्भातील अहवाल लवकरच शासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे.
आॅस्ट्रेलिया, स्पेन, अमेरिकेसारख्या देशांनी अवयवदान चळवळीचे महत्त्व फार पूर्वीच ओळखून त्याविषयी वैद्यकीय, शासन व सर्वसामान्य जनता अशा तिन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडवून आणली. त्यामुळे आज त्यांच्याकडे हजारो लोकांचे प्राण वाचत आहेत. भारतात सर्वसामान्यांमध्ये अवयवदानाविषयीची उदासीनता, गैरसमज आणि शासकीय रुग्णालयांमध्ये सोईंच्या अभावांमुळे ‘ब्रेन डेड’ रुग्ण उपलब्ध असतानाही अवयवदान होत नसल्याची शोकांतिका आहे. विशेष म्हणजे, ‘ह्युमन आॅर्गन ट्रान्सप्लांट’ कायदा १९९४ नुसार प्रत्येक ब्रेन डेड व्यक्तीची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’ ने (झेडटीसीसी) देणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात फार कमी माहिती या समितीला दिली जात आहे. यामुळे गेल्या सहा वर्षात केवळ ३० ‘ब्रेन डेड’ दात्याकडून अवयवदान होऊ शकले. हीच स्थिती थोड्या अधिक फरकाने इतर मेडिकलची आहे. अवयवदानाचा आकडा वाढण्यासाठी काय आवश्यक उपाययोजना करावायच्या आहेत व कुठल्या समस्या येत आहेत याची पाहणी करण्यासाठी मोहन फाऊंडेशन व टाटा ट्रस्टची चमू प्रत्येक मेडिकलला भेट देणार आहे. त्यानुसार मोहन फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक अमित शेनॉय यांनी मंगळवारी मेडिकलची पाहणी केली. यात ट्रॉमा केअर सेंटर, मेडिकलचे अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया गृह व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मूत्रपिंड प्रत्यारोपण विभागाची पाहणी केली. त्यांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशीही चर्चा केली. यात प्राथमिक स्तरावर अवयवदान वाढीसाठी स्वतंत्र पायाभूत सोईंची गरज असल्याचे समोर आले.