उपराजधानीत इथेनॉलमिश्रित पेट्रोल
By admin | Published: January 14, 2016 03:41 AM2016-01-14T03:41:44+5:302016-01-14T03:41:44+5:30
केंद्र शासनाच्या धोरणांतर्गत गेल्या तीन महिन्यांपासून नागपुरात १० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल मिळत असल्याची बाब फारच कमी नागपूरकरांना माहीत आहे.
१० टक्के वाटा : आयओसी, एचपी, बीपीसी कंपन्यांना दरदिवशी ६० हजार लिटरचा पुरवठा
सोपान पांढरीपांडे नागपूर
केंद्र शासनाच्या धोरणांतर्गत गेल्या तीन महिन्यांपासून नागपुरात १० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल मिळत असल्याची बाब फारच कमी नागपूरकरांना माहीत आहे. आयओसी, एचपी, बीपीसी या कंपन्या दररोज ६० लाख लिटर इथेनॉलची विक्री करीत आहेत. त्यामुळे दरदिवशी ११ लाख रुपयांची बचत होत आहे.
चार वर्षांपूर्वी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याची परवानगी दिली. पण त्यावेळी देशात इथेनॉल सहजपणे उपलब्ध होत नव्हते. त्यानंतर अनेक इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित झाले. आॅगस्ट २०१५ च्या पहिल्या आठवड्यात सरकारने इथेनॉल धोरणाचा आढावा घेतला. अखेर आॅक्टोबर २०१५ पासून इथेनॉल असलेल्या ठिकाणी पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याची परवानगी पेट्रोलियम मंत्रालयाने दिली. त्यात नागपूर भाग्यशाली ठरते. कारण पूर्ती पॉवर आणि शुगर लिमिटेडमध्ये (पीपीएसएल) इथेनॉलचे उत्पादन होत असल्यामुळे नागपूरकरांना १० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल मिळत आहे.
पीपीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर दिवे यांच्यानुसार इथेनॉल मोलासिसपासून तयार करण्यात येते. कंपनीच्या इथेनॉल प्रकल्पाची दरदिवशीची क्षमता १.२० लाख लिटर एवढी आहे. पण मोलासिसचा पुरवठा कमी असल्यामुळे दररोज ८० हजार लिटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येते. त्याचा पुरवठा इंडियन आॅईल कॉर्पोरेशन (आयओसी), हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी) आणि भारत पेट्रोलियम (बीपी) या तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांना करण्यात येते. आयओसी आणि एचपीचा डेपो खापरी येथे तर बीपीचा डेपो चंद्रपूर रोडवर बोरखेडी येथे आहे.
पीपीएसएल या तिन्ही कंपन्यांना प्रति लिटर ४८ रुपये दराने इथेनॉलची विक्री करीत असल्याचे दिवे यांनी स्पष्ट केले.
मूल्यसूत्रानुसार १०० कि़मी.च्या रेडियलमध्ये असलेले इथेनॉल ग्राहकाला ४८ रुपये लिटर, २०० कि़मी. रेडियलच्या आत ४८.५० रुपये आणि त्यावरील अंतरावर ४९ रुपये लिटर शुल्क आकारले जात असल्याचे दिवे यांनी स्पष्ट केले.
नागपूरकरांचा पेट्रोलवर दररोज चार कोटींचा खर्च
आयओसी नागपूर शहरात दररोज २४० किलोलिटर (२.४० लाख लिटर अर्थात २० टँकर) पेट्रोलचा पुरवठा करते. याचप्रकारे एचपी आणि बीपी अनुक्रमे १८०-१८० किलोलिटर (१.८० लाख लिटर अर्थात १५ टँकर) पेट्रोलचा पुरवठा करीत आहे. याप्रकारे तिन्ही कंपन्या जवळपास चार कोटी रुपये किमतीचे सहा लाख लिटर पेट्रोल दररोज शहरात उपलब्ध करून देत आहे.
शहरात दररोज ११ लाख रुपयांची बचत
पेट्रोलमध्ये ६० हजार लिटर इथेनॉलचे मिश्रण करण्यासाठी दररोज २८.८० लाख रुपयांचा खर्च येतो. याप्रकारे ३९.६० लाख रुपये किमतीच्या ६० हजार लिटर पेट्रोलची बचत होते. यानुसार शहरात दरदिवशी जवळपास ११ लाख रुपयांची बचत होत आहे.