जिल्ह्याला ५० हजार लसीचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:08 AM2021-05-12T04:08:27+5:302021-05-12T04:08:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लसीच्या अभावामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांसमोरदेखील अडचण झाल्याचे चित्र असून, नागपूर जिल्ह्यात लसीकरणाची गती मंदावली ...

Supply of 50,000 vaccines to the district | जिल्ह्याला ५० हजार लसीचा पुरवठा

जिल्ह्याला ५० हजार लसीचा पुरवठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लसीच्या अभावामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांसमोरदेखील अडचण झाल्याचे चित्र असून, नागपूर जिल्ह्यात लसीकरणाची गती मंदावली आहे. अशा नागपूरला ५० हजार लसीचा साठा प्राप्त झाला आहे. यामुळे या आठवड्यात कमीतकमी ४५ वर्षांवरील नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरळीत होईल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. यातील अर्ध्या लसी ग्रामीण भागात वापरण्यात येणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ओदिशा राज्यातील अंगुळ येथून चार टँकर ऑक्सिजन रात्री उशिरा नागपूरला रेल्वेद्वारे पोहोचणार आहे. मंगळ‌वारी जिल्ह्याला १२४ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला. शहरात पर्याप्त ऑक्सिजन उपलब्ध आहे. जिल्ह्यात मंगळवारी २,९७३ रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. या इंजेक्शनची मागणी करणाऱ्या प्रत्येक आस्थापनाला व खासगी हॉस्पिटलला त्याचे निर्धारित वितरण होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

ग्रामीण भागात जनजागृती

नागपूर जिल्हा प्रशासन जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात माघारलेल्या गावांना प्रबोधनाचा बूस्टर डोस देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावात प्रॅक्टिस करणारे डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, गावातील तरुणांचे लसीकरण व पॉझिटिव्ह संख्या कमी करण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी गावे पिंजून काढत आहेत. गावातील भेटीदरम्यान सध्या त्रिसूत्रीवर लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये कोरोना आजाराची तीव्रता सांगणारी सहा मिनिटाची वॉकिंग टेस्ट, कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांसाठी आवश्यक उपचार पद्धती आणि तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांचे कोरोनापासून कशा पद्धतीने संरक्षण करायचे, याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे.

बालरोगतज्ज्ञांची बैठक

दरम्यान, मंगळवारी जिल्हा प्रशासनाने नागपुरातील बालरोगतज्ज्ञांची बैठक घेतली. जिल्ह्यामध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये मुलांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी बालरोगतज्ज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Supply of 50,000 vaccines to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.