'पुरवणी मागण्यांमध्ये केवळ 750 कोटींची तरतूद, हा तर शेतकऱ्यांचा विश्वासघात'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 01:20 PM2019-12-16T13:20:00+5:302019-12-16T13:20:15+5:30
राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या
नागपूर - हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, सावरकरांच्या टीकेवरील मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. तसेच, सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी केवळ 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा हा विश्वासघात असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.
राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. आम्ही पुरवणी मागण्या मांडल्या, त्यावेळी आमच्यावर आक्षेप घेतला जात. 8 हजार कोटींच्या मागण्या कशा होतात, अशी टीका आमच्यावर होत. पण, सरकारकडून पुरवणी मागण्या मोठ्या येतील असा आम्हाला विश्वास होता. कारण, शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं होतं, असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
सरकारच्या या पुरवणी मागण्यांमध्ये 4500 कोटी रुपये आकस्मिता निधीसाठी जे उचलले, ते परत करण्याची तरतूद आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे जे नुकसान झालंय, त्यासाठी केवळ 750 कोटींची तरतूद केलीय. राज्यात शेतकऱ्यांचं 93 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. त्यासाठी 25 हजार कोटींची नुकसान भारपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी स्वत:च केली होती. पण, तरतूद फक्त 750 कोटी रुपयांची केलीय. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय. शेतकऱ्यांना दिलेलं पहिलं आश्वासन सरकारने पायदळी तुडवलंय. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. तसेच, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने 25 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.