नागपुरातील दुधाचा दिल्ली, हैदराबादला पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 12:05 AM2020-04-17T00:05:50+5:302020-04-17T00:06:55+5:30
नागपूर विभागात दर दिवशी जवळपास ४ लाख लिटर दूध शिल्लक राहत आहे. शिल्लक राहिलेल्या दुधापासून भुकटी तसेच दुग्धजन्य पदार्थ बनविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागात दर दिवशी जवळपास ४ लाख लिटर दूध शिल्लक राहत आहे. शिल्लक राहिलेल्या दुधापासून भुकटी तसेच दुग्धजन्य पदार्थ बनविण्यात येत आहे. शिवाय नागपूर जिल्ह्यातील दूध ग्राहकांपर्यंत पोहचविल्यानंतर मदर डेअरीच्या माध्यमातून दिल्ली व हैदराबाद येथे भुकटी व इतर पदार्थ तयार करण्यासाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. ‘कोरोना’मुळे ‘लॉकडाऊन’ असले तरी शहरातील नागरिकांना दुधाचा होणारा पुरवठा बाधित झालेला नाही. परंतु दुधाचा वापर काही प्रमाणात कमी झाला आहे. दूध संकलित करणाऱ्या संस्थांकडून दुधाची खरेदी पूर्वीप्रमाणे होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी व दूध उत्पादक अडचणीत येत आहेत. यासाठी जिल्ह्यातील खेड्यापाड्यापासून सर्व ठिकाणांहून दूध संकलित करून त्याचे योग्य वितरण झाल्यानंतर उरलेल्या दुधापासून भुकटी बनविण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. आरोग्याच्या दृष्टीने दुधाचे अनेक फायदे आहे. त्यामुळे जनतेने दैनंदिन आहारात दुधाचा वापर वाढवावा, असे आवाहन केदार यांनी केले आहे.