बंद पडलेल्या एसटीला ब्रेक व्हॅनचा आधार : नागपूर विभागात पहिली व्हॅन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 01:26 AM2019-04-11T01:26:19+5:302019-04-11T01:26:56+5:30
प्रवासात अनेकदा एसटीची बस बंद पडते. प्रवासी खाली उतरून बसला धक्का मारत असल्याचे दृष्य आपण नेहमीच पाहतो. परंतु यापुढे असे दृष्य पाहावयास मिळणार नाही. एसटीच्या नागपूर विभागात ‘ब्रेक डाऊन व्हॅन’ (दुरुस्ती पथक) दाखल झाली आहे. या गाडीत बस दुरुस्त करण्यासाठी अत्याधुनिक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. बंद पडलेल्या एसटी बसची माहिती मिळताच तातडीने संबंधित ठिकाणी जाऊन ही व्हॅन त्या बसची दुरुस्ती करणार आहे.
दयानंद पाईकराव/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवासात अनेकदा एसटीची बस बंद पडते. प्रवासी खाली उतरून बसला धक्का मारत असल्याचे दृष्य आपण नेहमीच पाहतो. परंतु यापुढे असे दृष्य पाहावयास मिळणार नाही. एसटीच्यानागपूर विभागात ‘ब्रेक डाऊन व्हॅन’ (दुरुस्ती पथक) दाखल झाली आहे. या गाडीत बस दुरुस्त करण्यासाठी अत्याधुनिक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. बंद पडलेल्या एसटी बसची माहिती मिळताच तातडीने संबंधित ठिकाणी जाऊन ही व्हॅन त्या बसची दुरुस्ती करणार आहे.
अनेकदा मार्गात एसटीची बस पंक्चर झाल्यानंतर, तांत्रिक बिघाड झाला की बंद पडते. अशा वेळी तातडीने दुसऱ्या गावाला पोहोचायचे असल्यामुळे गाडीतील प्रवासी चालक-वाहकांवर आपला रोष व्यक्त करतात. चालक-वाहकांचा यात काही दोष नसताना त्यांनाही प्रवाशांचे बोलणे ऐकावे लागते. त्यानंतर संबंधित चालक-वाहक याची सूचना डेपोला देत होते. डेपोतून दुसरी बस पाठविल्यानंतर संबंधित बसची दुरुस्ती करण्यात येत होती. तर संबंधित बसमधील प्रवाशांची व्यवस्था दुसऱ्या बसमध्ये करून त्यांना रवाना करण्यात येत होते. परंतु बंद पडलेल्या बसची दुरुस्ती करण्यासाठी साहित्याची जुळवाजुळव करण्यात बराच वेळ खर्ची होत होता. यावर तोडगा म्हणून एसटी महामंडळाने ‘ब्रेक डाऊन व्हॅन’ उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बंद पडलेल्या बसची तातडीने दुरुस्ती होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक विजय कुडे यांनी दिली. सध्या गणेशपेठ आगारात ही व्हॅन ठेवण्यात आली असून शहरातील इमामवाडा, घाट रोड, मोरभवन आणि वर्धमाननगरमधील बंद पडलेल्या बसला ही व्हॅन सुविधा पुरविणार आहे.
काय राहील व्हॅनमध्ये ?
एखादी बस पंक्चर झाल्यास ब्रेक डाऊन व्हॅनमध्ये पंक्चर काढण्याचे सर्व साहित्य, हवा भरण्यासाठी कॉम्प्रेसर राहील. याशिवाय एसटी बसचे सर्व स्पेअर पार्ट, ग्रीस मशिन, मेकॅनिकल टुल्सचा समावेश राहणार आहे. याशिवाय बंद पडलेल्या बसची दुरुस्ती करण्यासाठी तज्ज्ञ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा ‘ब्रेक डाऊन व्हॅन’मध्ये समावेश राहणार आहे.
सर्वच आगारात होणार उपलब्ध
‘ब्रेक डाऊन व्हॅन’ टप्प्याटप्याने नागपूर विभागातील सर्वच आगारात उपलब्ध होणार आहे. यामुळे नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार असून वेळेची मोठी बचत होईल.’
अशोक वरठे, विभाग नियंत्रक,नागपूर