बाल कर्करुग्णांना अद्ययावत उपचाराचा आधार : 'कॅनकिड' संस्थेशी सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 11:27 PM2020-01-04T23:27:40+5:302020-01-04T23:29:27+5:30
अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा ‘कॅनकिड’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात दरवर्षी सुमारे ३० ते ४० हजार मुलांना कर्करोग (कॅन्सर) होतो. त्यापैकी ७० ते ८० टक्के बालकांचा जागरूकतेचा अभाव, उशिरा निदान, अपुऱ्या उपचारांच्या सोयी किंवा आवाक्याबाहेरचा खर्च यामुळे मृत्यू होतो. बालपणातील कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १६.२३ टक्के एवढा आहे. विशेषत: अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा ‘कॅनकिड’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे.
नागपूर मेडिकलच्या बालरोग विभागाच्यावतीने नुकतेच कर्करोगावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी या सामंजस्य कराराची माहिती दिली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आनंद पाठक, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. हरीश वरभे, डॉ. पंकज द्विवेदी व डॉ. रत्ना शर्मा उपस्थित होते.
करारामुळे अद्ययावत उपचार व आर्थिक मदत
डॉ. मुखर्जी म्हणाले, २०१२ पासून मेडिकलमधील कर्करोगाच्या बालरुग्णांना ‘कॅनकिडस्’कडून सेवा दिली जात आहे. या करारामुळे ही सेवा आता अधिकृत झाली आहे. यात चार रुग्णालयांचा समावेशही करण्यात आला आहे. या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्याबाल कर्करुग्णांचा पाठपुरावा घेणे, उपचार सोडलेल्या रुग्णांचा शोध घेणे, रुग्णांच्या येण्या-जाण्याची आर्थिक अडचण सोडविणे, त्यांच्या शिक्षणाची सोय करारामध्ये अंतर्भूत आहे.
दुर्गम भागात वैद्यकीय सेवा पोहचविण्याची गरज
डॉ. लहाने म्हणाले की, गावखेड्यासोबतच दुर्गम भागात डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा पोहचविण्याची गरज आहे. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. बाल कर्करुग्णांसाठी स्वतंत्र खाटांची सोय व इतरही अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही डॉ. मित्रा यांनी दिली. प्रास्ताविक डॉ. जैन यांनी केले.