अपंगांना आधार द्या, ते दिव्यांग बनतील : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 08:11 PM2021-06-12T20:11:53+5:302021-06-12T20:12:29+5:30
Governor Bhagat Singh Koshyari अपंगांना मार्गदर्शन मिळाले तर ते पुढे येतील आणि त्यांना आधार मिळाला तर ते दिव्यांग बनतील. त्यामुळे समाजाने अंग बाधितांची आधारवड होण्याचे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपंगांना मार्गदर्शन मिळाले तर ते पुढे येतील आणि त्यांना आधार मिळाला तर ते दिव्यांग बनतील. त्यामुळे समाजाने अंग बाधितांची आधारवड होण्याचे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज येथे केले. नागपुरात दौऱ्यावर असताना शनिवारी त्यांनी दक्षिण अंबाझरी मार्गावरील दी ब्लाईण्ड रिलिफ असोसिएशनच्या शाळा व वसतीगृहाला भेट दिली. त्यावेळी ते नवदृष्टी सभागृहात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे व सचिव राजेश कानगे उपस्थित होते.
उत्तर भारतात सुरदास यांच्या रचना सर्वश्रेष्ठ मानल्या जातात. त्यांच्या रचनांची तुलना कोणत्याच कविशी होत नाही, असे मानले जाते. ते नेत्रबाधित होते. मात्र, तरीही दिव्य दृष्टीच्या भरवशावर त्यांना हे स्थान प्राप्त झाले. मिल्टन हे सुद्धा नेत्रबाधित होते. मात्र, त्यांचे साहित्य उच्च दर्जाचे मानले जाते. आपल्याकडील दिव्यांगांनाही आधार मिळाला तर ते पूर्ण शक्ती एकवटून आपले अस्तित्त्व सिद्ध करतील. दिव्यांगता ही ईश्वराची लिला आहे आणि त्यांना सहकार्य करण्याचे धडे शास्त्र देतो, असे भगतसिंग कोश्यारी यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन मेघा पाध्ये यांनी केले तर आभार गजानन रानडे यांनी मानले. तत्पूर्वी त्यांनी शाळेच्या आवारात तुळशीच्या रोपट्याचे रोपण केल्यानंतर शाळेचे अवलोकन केले. व्यवसाय प्रशिक्षण कर्मशाळा, संगणक प्रशिक्षण शाळा, स्टडी सेंटर व वाचनालय, स्वयंपाकघर आदिंचे अवलोकन करत त्यांनी संस्थाचालकांना मार्गदर्शनही केले.
शरयू तिराला ईश्वरी अधिष्ठान दे
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे स्वागत दिव्यांग विद्यार्थीनी ईश्वरी पांडे हिने पुष्पगुच्छ देऊन केले. ईश्वरी ही उत्तम जलतरणपटू आहे. तिचे गुण ऐकून कोश्यारी यांनी शरयू तिरावर आपले कौशल्य दाखव आणि शरयू तिराला खऱ्या अर्थाने ईश्वरी अधिष्ठान दे, अशा प्रकारचे आमंत्रण ईश्वरीला दिले.
वेदिकाने केले वाचन
पार्शियल ब्लाईण्ड असलेली १२व्या वर्गाची विद्यार्थीनी वेदिका गेडाम हिने संगणकावर वृत्तपत्राचे वाचन कशा तऱ्हेने केले जाते, हे भगतसिंग कोश्यारी यांना दाखवले. यावेळी तिने संगणक प्रयोगशाळेत असलेल्या ॲमी ब्रेल मशिन, थर्मल इम्बॉसर आदिंची माहिती दिली.
ब्रेल लायब्ररी बघून राज्यपाल खुश
नेत्रबाधितांसाठी शाळेने तयार केलेली अद्ययावर ब्रेल लायब्ररी स्टडी सेंटरचे अवलोकन करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आनंद व्यक्त केला. नेत्रबाधितांनाही सर्वसामान्यांसारखे पुस्तक वाचन, श्रवण आदी करणे सोपे होत आहे, याचे कौतुक केले.