शहीद भूषण सतईच्या कुटुंबीयांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:40+5:302021-02-05T04:37:40+5:30
काटोल : काटोल शहरातील शहीद सैनिक भूषण सतई यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने आर्थिक बळ देण्यात आले आहे. शहीद ...
काटोल : काटोल शहरातील शहीद सैनिक भूषण सतई यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने आर्थिक बळ देण्यात आले आहे. शहीद सतई यांच्या आई-वडिलांना प्रत्येकी ५० लाख रुपयाचा धनादेश गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी सुपूर्द करण्यात आला. काश्मीर येथील गुरेज सेक्टर येथे १३ नोव्हेंबर २०२० रोजी भूषण सतई यांना वीरमरण आले. यानंतर शहीद सैनिकाच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयाची आर्थिक मदत राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निधीपैकी प्रत्येकी ५० लाख रुपयाचा धनादेश शहीद भूषणच्या आई मीरा आणि वडील रमेश सतई यांना सुपूर्द करण्यात आला. काटोल पोलीस स्टेशनच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, ठाणेदार महादेव आचरेकर, जयपालसिंग गिरासे, विश्वास फुल्लरवार, मंगेश काळे, सह. पोलीस निरीक्षक राहुल बोंद्रे उपस्थित होते. शहीद भूषणची देशसेवा काटोलकरांच्या सदैव स्मरणात राहील, असा विश्वास गृहमंत्री देशमुख यांनी याप्रसंगी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन हेमंत चोपडे यांनी केले.