कुख्यात डल्लूच्या समर्थकांना पोलिसांनी न्यायालयातून हुसकावले
By Admin | Published: November 15, 2014 02:45 AM2014-11-15T02:45:53+5:302014-11-15T02:45:53+5:30
महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कुख्यात डल्लू सरदार ....
नागपूर : महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कुख्यात डल्लू सरदार ऊर्फ नरेंद्रसिंग दिगवा याला शुक्रवारी न्यायालयात भेटण्यासाठी आलेल्या २०-२५ समर्थकांना न्यायालय सुरक्षेतील पोलीस ताफ्याने हुसकावून लावले.
टोळीचा म्होरक्या डल्लू सरदार आणि त्याच्या बारा साथीदारांना आज कारागृहातून कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते. या आरोपींविरुद्ध आज मोक्काचे विशेष न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात आरोप निश्चित होणार होते. परंतु त्यांचे वकील अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी न्यायालयाला असे सांगितले की, आरोपी डल्लू सरदार याने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.
ही याचिका १७ नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी आहे. त्यामुळे आपणास वेळ देण्यात यावा. यावर न्यायालयाने पुढची तारीख २० नोव्हेंबर ठेवली आहे.
डल्लूने आधी मोक्काच्या विशेष न्यायालयात आपणास मोक्काच्या आरोपातून मुक्त करण्यात यावे , असा अर्ज केला होता. तो १० जानेवारी रोजी न्यायालयाने फेटाळला होता. याविरुद्ध डल्लूने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने मोक्का विशेष न्यायालयाचा आदेश योग्य ठरवून डल्लूचे अपील खारीज केले होते.
डल्लू आणि त्याच्या साथीदारांविरुद्धच्या गुन्ह्याची हकीकत अशी की, पाचपावली वैशालीनगर येथील रहिवासी असलेल्या डल्लू याने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन १८ नोव्हेंबर २०१२ रोजी लष्करीबाग येथील प्रॉपर्टी डीलर सूरज यादव याचा दिवसाढवळ्या दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सशस्त्र हल्ला करून खून केला होता.
सूरजची पत्नी मनदीप आणि भाऊ राजेश यांच्यावरही हल्ला करून त्यांना जखमी केले होते. सूरजच्या मेव्हण्याच्या मित्राची झिंगाबाई टाकळी येथील १४००० चौरस फुटाचा भूखंड हडपण्यातून डल्लू आणि साथीदारांनी हा खुनी हल्ला केला होता. पाचपावली पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३०२, ३०७, ३२३, ५०४, ५५२, ५०६-ब, २०१, हत्यार कायद्याच्या कलम ३, ४ व २५, मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ व मोक्काच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविला. सर्व १६ आरोपींना अटक केली होती. या आरोपींपैकी केवळ एका आरोपीला जामीन मिळालेला आहे.
आज नियमित न्यायालयीन पेशीसाठी डल्लूसह १३ जणांना न्यायालयात आणण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित होणार होते. परंतु बचाव पक्षाने पुढची तारीख मागितली. न्यायालयात विशेष सरकारी वकील पी. के. सत्यनाथन आणि फिर्यादी राजेश यादवचे वकील अॅड. बी. एम. करडे न्यायालयात उपस्थित होते.
दरम्यान डल्लूला न्यायालयात आणण्यात येणार असल्याच्या खबरेने त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यादव यांच्याकडील लोकही न्यायालयात आले होते. त्यामुळे न्यायालय सुरक्षा चौकीचे प्रमुख उपनिरीक्षक विजयकुमार वाकसे आणि त्यांच्या सहकारी पोलीस ताफ्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन डल्लू सरदार आणि यादव यांच्या समर्थकांना न्यायालय परिसराच्या बाहेर हुसकावून लावले. (प्रतिनिधी)