‘राफेल’ चौकशी दाबण्यासाठीच ‘सीबीआय’चे महाभारत : यशवंत सिन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 08:13 PM2018-10-24T20:13:53+5:302018-10-24T20:15:27+5:30
‘सीबीआय’मध्ये सुरू असलेले महाभारत नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आले आहे. ‘राफेल’ कराराबाबतची तक्रार स्वीकारल्यामुळे ‘सीबीआय’च्या संचालकांवर सरकारची नाराजी होतीच. या प्रकरणातील पुढील चौकशी टाळण्यासाठीच नियमांना बगल देत संचालकांना दीर्घकालीन सुटीवर पाठविण्यात आले व मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सीबीआय’मध्ये सुरू असलेले महाभारत नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आले आहे. ‘राफेल’ कराराबाबतची तक्रार स्वीकारल्यामुळे ‘सीबीआय’च्या संचालकांवर सरकारची नाराजी होतीच. या प्रकरणातील पुढील चौकशी टाळण्यासाठीच नियमांना बगल देत संचालकांना दीर्घकालीन सुटीवर पाठविण्यात आले व मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
यावेळी भाजपाचे असंतुष्ट खासदार शत्रुघ्न सिन्हा, ‘आप’चे खा.संजय सिंह, माजी आमदार आशिष देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. ‘सीबीआय’मध्ये झालेल्या खेळखंडोब्याने हे दाखवून दिले आहे की देशात कायद्याचे राज्य राहिलेलेच नाही. पंतप्रधान किंवा कॅबिनेट सीबीआय प्रमुखांना पदावरून काढू शकत नाही. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. केंद्र सरकारच्या अशा भूमिकांमुळे ‘सीबीआय’सारख्या संस्थांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. देशाला केंद्र सरकारने ‘बनाना रिपब्लिक’ बनविण्याचेच प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी लावला.
‘राफेल’ प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात अरुण शौरी, प्रशांत भूषण आणि इतर काही लोकांनी कागदोपत्री पुराव्यांसह सीबीआयकडे तक्रार दिली होती. सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांनी ती तक्रार स्वीकारली. तसेच तक्रारीसोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांना पुरावा म्हणून ग्राह्य धरायचे का याबाबत मत मागण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांना विचारणा केली. यामुळेच सरकारची नाराजी त्यांना झेलावी लागली, असे यशवंत सिन्हा म्हणाले.
राकेश अस्थाना हे कठपुतळी
यावेळी खा.संजय सिंह यांनी राकेश अस्थाना हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला. गुजरात कॅडरचे पोलीस अधिकारी राकेश अस्थाना हे पंतप्रधान आणि अमित शाह यांच्या गोतावळ्यातील आहेत. ‘सीबीआय’मधील प्रकरणे आपल्या पद्धतीने हाताळणे आणि काही प्रकरणे दाबण्यासाठी अस्थाना यांची नियुक्ती करण्यात आली होती. संचालकपदाची प्रभारी जबाबदारी नागेश्वर राव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र ते भ्रष्ट अधिकारी आहेत, असा दावा त्यांनी केला.
अजित डोवाल यांना इतके अधिकार का ?
यावेळी यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरदेखील टीका केली. अजित डोवाल यांच्यासारख्या प्रशासकीय व्यवस्थेतील व्यक्तीला इतके अधिकार देणे हे लोकशाहीसाठी योग्य नाही. त्यांना केंद्राने ‘सुपर इंटेलिजन्ट स्टार’ बनविले आहे, असे सिन्हा म्हणाले.