Supriya Sule: 'शिवसेना-भाजप युती व्हायला ती काही 'इन्स्टंट कॉफी' नाही'; सुप्रिया सुळेंचा मिश्कील टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 10:47 AM2021-08-28T10:47:08+5:302021-08-28T10:47:40+5:30
Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज नागपूरात एका कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज नागपूरात एका कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल भेट झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये केवळ राजकीय वितुष्ट आहेत अशी विधानं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून केली जात असताना याबाबत सुप्रिया सुळेंना विचारणा करण्यात आली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी मिश्किल टोला लगावला.
उद्धव ठाकरे-फडणवीस यांच्यात बंदद्वार ‘गुफ्तगू’; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना आले उधाण
"शिवसेना-भाजपचे नेते भेटतात, त्यात काही चुकीचं नाही. राजकारणापलीकडे वैयक्तिक संबंध जपण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. शिवसेना-भाजपचे नेते भेटले की लगेच युती व्हायला ती काही इन्स्टंट कॉफी नाही आणि अशा घटनांवर तातडीनं प्रतिक्रिया द्यायला माझं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
'ईडी'चा राष्ट्रवादीला नेहमी फायदाच
ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी ईडीची चौकशी आमच्यासाठी चांगलीच आहे. कारण ईडीचा राष्ट्रवादीला नेहमी फायदाच झाला आहे, असा उपरोधिक टोला लगावला.
महाविकास आघाडी सरकार ५ नव्हे, २५ वर्ष टीकणार
महाविकास आघाडी सरकार भक्कम असून जनतेच्या मनामनात या सरकारनं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कुणी किती प्रयत्न केले किंवा राजकीय डावपेच आखले तरी त्याचा काही फायदा होणार नाही. कारण केवळ ५ वर्षे नव्हे, तर महाविकास आघाडी सरकार राज्यात पुढची २५ वर्ष काम करणार आहे, असा विश्वास देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.