‘सूर ज्योत्स्ना’चे सूर २३ मार्चला नागपुरात निनादणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:40 PM2018-03-17T13:40:36+5:302018-03-17T13:40:46+5:30
लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ चे वितरण शुक्रवार, २३ मार्च रोजी नागपुरात होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ चे वितरण शुक्रवार, २३ मार्च रोजी नागपुरात होत आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल. संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांच्या सन्मान सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते बांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या सोहळ्याचे मुख्य अतिथी असतील. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दरवर्षी हा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिला जातो.
देशभरातील संगीत प्रतिभांना शोधून त्यांना प्रोत्साहित करणे हा या पुरस्काराचा मूळ उद्देश असून मागच्या चार वर्षात या मंचाने अनेक कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भावी वाटचालीकरिता प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे. लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार हा असा मंच आहे ज्याने अनेक नवीन संगीतकारांची देशाला ओळख करून देण्यासोबत संगीताचे क्षेत्र विस्तारण्यात मोलाचे योगदान दिले आहे. मागच्या चार वर्षात या पुरस्काराने अवघ्या देशात स्वत:ची एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे. यंदाच्या या पाचव्या पर्वात ज्येष्ठ अभिनेत्री पद्मभूषण वहिदा रहमान यांची मुलाखत आणि तरुणाईचा लाडका गायक अंकित तिवारी यांची संगीतमय श्रद्धांजली हे विशेष आकर्षण राहणार आहेत. याप्रसंगी प्रसिद्ध चित्रपट व संगीत समीक्षक, लेखिका भावना सोमय्या अभिनेत्री वहिदा रहमान यांची ३० मिनिटांची मुलाखत घेणार आहेत. तर अमृता फडणवीस यावेळी गीते सादर करतील. जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांचे संगीतमय सादरीकरणही यावेळी होणार आहे.
परिवार चाय प्रस्तुत आणि हिलफोर्ट पब्लिक स्कूल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला असून, ९२.७ बिग एफएम हे रेडिओ पार्टनर तसेच ब्राईट आऊटडोअर हे या कार्यक्रमाचे आऊटडोअर पार्टनर व ग्रीन ट्युन्स हे ग्रीन पार्टनर आहेत.
हे मान्यवर करतील विजेत्यांची निवड
संगीतकार आणि गायक शंकर महादेवन, संगीत दिग्दर्शक प्रीतम, सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक रुपकुमार आणि सोनाली राठोड, शास्त्रीय संगीत तज्ज्ञ शशी व्यास आणि टाईम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर हे मान्यवर पाचव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत.