‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2024 09:16 AM2024-03-13T09:16:08+5:302024-03-13T09:16:38+5:30

पद्मविभूषण पंडित रामनारायण, पद्मभूषण डॉ. एल. सुब्रमण्यम ‘लेजंड’, तर रूपकुमार राठाेड ‘आयकाॅन’ ज्ञानेश्वरी गाडगे, अरमान खान यांचा होणार गौरव: भक्तीचे सुकाेमल स्वर आणि शास्त्रीय गायनाचा आलाप

sur jyotsna national music award 2024 announced | ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ जाहीर

‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : वारकरी संत परंपरेच्या अभिजात संगीताला साजेसा मंत्रमधुर स्वर आणि शास्त्रीय गायनाच्या उतार चढावाची ताण देत बहारदार गायनाने अवघ्या महाराष्ट्राला व देशालाही मंत्रमुग्ध करणारी गायिका ज्ञानेश्वरी गाडगे आणि ‘रामपूर सहस्वान घराण्या’चा वारसा घेऊन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात नवा आलाप छेडणारा अरमान खान हे दाेन कलावंत ११व्या  ‘सूर ज्याेत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०२४ ’ चे विजेते ठरले आहेत. 

लोकमत सखी मंच’च्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त ‘लोकमत समूहा’च्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘सूर ज्याेत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०२४’चे वितरण शनिवारी (दि. २३ मार्च) नागपुरातील मानकापूर  विभागीय क्रीडा संकुलात सायंकाळी ६ वाजता होत आहे. संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांच्या सन्मान सोहळ्याचे यंदाचे हे ११ वे वर्ष आहे. या विशेष मैफलीत प्रख्यात सारंगी वादक पद्मविभूषण पंडित रामनारायण, ख्यातनाम व्हाॅयोलिन वादक पद्मभूषण एल. सुब्रमण्यम यांना ‘लेजंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, चतुरस्त्र प्रतिभेचे गायक रूपकुमार राठाेड यांना ‘आयकाॅन’ पुरस्काराने गाैरविण्यात येणार आहे. 

अरमान खान 

उस्ताद निसार हुसैन खान आणि वडील पद्मभूषण उस्ताद राशीद खान यांच्या गायनाचे स्वर ऐकतच वाढलेला अरमान बालपणापासून त्याकडे ओढला गेला आणि ‘रामपूर-सहस्वान घराण्या’चा वारसा घेऊन आत्मविश्वासाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात त्याने पदार्पण केले. शास्त्रीय संगीताचे बहारदार आलाप व अखंडित ताण देत गाणाऱ्या अरमानच्या गायनाने ताे लाेकप्रिय ठरत असून भारतीय संगीत क्षेत्राचा ताे उगवता तारा ठरत आहे. 

ज्ञानेश्वरी गाडगे

ऑटाेरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे ठाण्यामधील विटावा येथील गणेश गाडगे यांची कन्या ज्ञानेश्वरीने सारेगमप लिटल चॅम्प्समधील गायनाने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले आहे. या कार्यक्रमाच्या ऑडिशनसाठी ज्ञानेश्वरी शालेय गणवेशातच पाेहोचली हाेती. मात्र, या ऑडिशनमध्ये ज्ञानेश्वरीने गायलेल्या शास्त्रीय गाण्याने परीक्षकांसह प्रेक्षक अवाक् झाले होते. तिच्या या ऑडिशनचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता आणि प्रत्येक जण या गाेड गळ्याच्या मुलीचे मधुर स्वर मंत्रमुग्ध हाेऊन ऐकायला लागले. हेच तिच्या लाेकप्रियतेचे गमक आहे.

पद्मभूषण उस्ताद राशिद खान व पद्मश्री पंकज उधास यांना मरणोपरांत पुरस्कार

या सोहळ्यात प्रख्यात क्लासिकल सिंगर पद्मभूषण उस्ताद राशिद खान व प्रख्यात गझलगायक पद्मश्री पंकज उधास यांना मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यांचे कुटुंबीय हा पुरस्कार स्वीकारतील. याचवेळी त्यांना आदरांजली अर्पण केली जाईल.

या पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान ख्यातनाम गायक सुखविंदर सिंग यांचा लाइव्ह म्युझिकल कॉन्सर्ट या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असेल.

या मान्यवरांनी केली विजेत्यांची निवड 

सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग, सुप्रसिद्ध गायिका सुनाली रूपकुमार राठाेड, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे, शास्त्रीय संगीताचे जाणकार शशी व्यास व टाइम्स म्युझिकच्या गाैरी यादवाडकर, ‘लाेकमत’ एडिटोरिअल बाेर्डाचे चेअरमन व माजी खासदार डाॅ. विजय दर्डा, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा अशा तज्ज्ञांच्या निवड समितीने या विजेत्यांची निवड केली आहे. 
 

Web Title: sur jyotsna national music award 2024 announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.