सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २२ला

By Admin | Published: March 20, 2015 02:32 AM2015-03-20T02:32:01+5:302015-03-20T02:36:45+5:30

लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त ...

Sur Jyotsna National Music Awards on 22nd | सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २२ला

सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २२ला

googlenewsNext

नागपूर : लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त प्रदान करण्यात येणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २२ मार्च रोजी चिटणीस पार्क, महाल येथे नवोदित प्रतिभावंतांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून हा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता होईल. हा पुरस्कार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल, अशी माहिती लोकमत समूहाचे संचालक (परिचालन) अशोक जैन यांनी दिली.
याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा व कोळसा मंत्री पीयूष गोयल, राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, अभिनेता जॉन अब्राहम, आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायक व संगीतकार हरिहरन, विशिष्ट शैलीदार गायनासाठी लोकप्रिय असलेले प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड आणि गायिका सोनाली राठोड प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात हरिहरन आणि त्यांच्या सोल इंडिया बँडचे कलावंत संगीतसंध्या सादर करून ही सायंकाळ अविस्मरणीय करणार आहेत.
श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांनी महाराष्ट्र आणि गोवा येथे सखी मंचची स्थापना करून सखी अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. या अभियानात २. ५ लाखापेक्षा अधिक कुटुंब लोकमतशी जुळले आहेत. त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाचे यशस्वी प्रयत्न केले. यातून महिलांना स्वयंरोजगार आणि आत्मविश्वास मिळाला. त्यांच्या जगण्याला एक दिशा देण्यात ज्योत्स्ना दर्डा यांचे योगदान मोठे आहे. नागपुरात जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीची स्थापना करून त्यांनी संगीताचा प्रवाह सहजपणे सखींच्या आयुष्यात आणला. त्यांनी आयुष्यभर स्वरांची साधना केली. संगीतावर असणारे त्यांचे विलक्षण प्रेम आणि त्यांची संगीत साधना लक्षात घेत त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मागील वर्षी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराला प्रारंभ करण्यात आला.
या पुरस्कारासाठी संगीत क्षेत्रातील मातब्बर संगीतकार नवोदित गायकांची निवड करतात. मागील वर्षी या पुरस्कारासाठी पं. जसराज, डॉ. एल. सुब्रमण्यम, हरिहरन, कविता कृष्णमूर्ती आणि प्रसून जोशी यांनी नवोदित गायकांचे परीक्षण केले होते. परीक्षकांनी दिलेल्या निर्णयानुसार मागील वर्षी कोलकाताचे शास्त्रीय गायक अरशद अली खान आणि मुंबईची गायिका रिवा राठोड यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा सन्मान निधी, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यंदाही संगीत क्षेत्रातील नवोदित प्रतिभावंतांना सन्मानित करण्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी सर्व रसिकांना मिळणार आहे.
राष्ट्रीय स्तरावर कला कौशल्याने स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या दोन प्रतिभावंत कलावंताना यंदा स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारप्राप्त कलावंतांना या कार्यक्रमात साधारणत: प्रत्येकी १५ मिनिटांचा वेळ त्यांच्या कला सादरीकरणासाठी देण्यात येईल.

Web Title: Sur Jyotsna National Music Awards on 22nd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.