सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण सोहळा २२ मार्चला
By Admin | Published: March 18, 2015 02:45 AM2015-03-18T02:45:25+5:302015-03-18T02:45:25+5:30
लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त प्रदान करण्यात येणारा...
नागपूर : लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त प्रदान करण्यात येणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २२ मार्च रोजी चिटणीस पार्क, महाल येथे प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार समारंभात राष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक हरिहरन यांच्या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच ‘सोल आॅफ इंडिया’ बँडचे सादरीकरण संगीत रसिकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असणार आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड प्रामुख्याने उपस्थित राहतील.
महाराष्ट्र आणि गोवा येथे सखी मंचाच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरणाचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांना संगीतात विशेष रुची होती. त्यांनी आयुष्यभर स्वरांची साधना केली. त्यांच्या संगीत साधनेचा आदर करीत मागील वर्षी त्यांच्या प्रथम स्मृतिनिमित्त सूर ज्योत्स्ना पुरस्काराला प्रारंभ करण्यात आला. संगीत क्षेत्रात नवोदित प्रतिभावंत गायकांना सन्मानित करण्यासाठी स्त्री आणि पुरुष असे दोन गट पुरस्कारासाठी ठेवण्यात आले. या पुरस्काराचे परीक्षक म्हणून पं. जसराज, डॉ. एल. सुब्रमण्यम, हरिहरन, कविता कृष्णमूर्ती आणि प्रसून जोशी यांनी जबाबदारी स्वीकारली होती. यंदाही दिग्गज कलावंतांच्या परीक्षणातून तावून सुलाखून आलेल्या नवोदित कलावंतांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चिटणीस पार्क, महाल येथे होणाऱ्या भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हरिहरन यांचे सुरेल गायन आणि सोल इंडिया बँडचे संगीत या कार्यक्रमाला वेगळी उंची प्रदान करणार आहे. (प्रतिनिधी)