सूर, तालमध्ये रंगले ‘सूर रायझिंग स्टार्स’
By admin | Published: February 7, 2017 01:55 AM2017-02-07T01:55:53+5:302017-02-07T01:55:53+5:30
कलर्स व लोकमत सखी मंचच्या माध्यमातून पुन्हा एकदा आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करून रसिकांना सुरेल स्वरयात्रेचा प्रवास घडवून आणला.
स्पर्धेत नवोदित व हौशी गायकांचा कलाविष्कार : कलर्स व लोकमत सखी मंचचा उपक्रम
नागपूर : कलर्स व लोकमत सखी मंचच्या माध्यमातून पुन्हा एकदा आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करून रसिकांना सुरेल स्वरयात्रेचा प्रवास घडवून आणला. निमित्त होते, नागपूर येथे आयोजित ‘सूर रायझिंग स्टार्स’ या गीतगायन स्पर्धेचे. नवोदित व हौशी गायकांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलाविष्कारामुळे या स्पर्धेत रंगत आली.
संपूर्ण महाराष्ट्र ‘सूर रायझिंग स्टार्स’च्या निमित्ताने गाऊ लागले आहे. या कार्यक्रमाला घेऊन नवोदित व हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सूर रायझिंग स्टार्स’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक फेरीत २५० वर स्पर्धक सहभागी झाले होते. यातील उत्कृष्ट २० स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. १ फेब्रुवारी रोजी लोकमत भवन येथे आयोजित अंतिम फेरीत या स्पर्धकांनी एकाहून एक सरस गाणी सादर केली. या सुरेल स्वरयात्रेत स्पर्धकांनी ‘सूर निरागस हो’, ‘तू जाने या ना जाने’, ‘नैना ठग लेंगे’, ‘दिल चीज क्या है’, ‘रंगीला रे’, ‘लागा चुनरी में दाग’, ‘फुल गेंदवा न मारो’, ‘अहसान तेरा होगा’ आदी गीत सादर करून रसिकांची भरभरून दाद घेतली. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध गायक चेतन बालपांडे आणि प्रा. रजनी हुड्डा यांनी केले. स्पर्धेच्या दरम्यान विदर्भ के किशोर कुमार फेम सागर मधुमटके व गौरी शिंदे यांनी मिळून ‘जय जय शिव शंकर’ गीत सादर करून धमाल उडविली. सागरने गायलेल्या ‘तुम जो मिल गए हो’ व ‘फिर वही रात है’ या गीताने रसिक मंत्रमुग्ध झाले. संचालन नेहा जोशी यांनी केले.
मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल. आयुष्यातल्या प्रत्येक भावनांचे रंग मालिकेद्वारे सादरीकरण करून कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्याचप्रमाणे लोकमत सखी मंचने सलग १६ वर्षे सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून सखींच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.(प्रतिनिधी)
‘रायझिंग स्टार्स’ मालिका
पुन्हा एकदा नवोदित आणि हौशी गायक कलाकारांसाठी रायझिंग स्टार्स ही मालिका कलर्स चॅनलवर ४ फेब्रुवारीपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार आहे. या मालिकेमधून ‘रायझिंग स्टार्स’ निश्चितच झळकू लागले आहेत. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम ‘लाईव्ह’ दिसणार आहे. इतर ‘शो’सारखे परीक्षकानुसार कलाकारांना सादरीकरण करायचे नसून कलाकारांचा ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ बघून जनतेला मतदान करायचे आहे. मतदान करणाऱ्याचा चेहरा ‘स्क्रीन’वर झळकणार आहे. अतिशय आगळावेगळा अशा या कार्यक्रमाचे परीक्षक प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर, अभिनेता आणि गायक दिलजित दोसांझ आहेत. जनतेच्या आणि सेलिब्रेटी परीक्षकांच्या निर्णयावर ठरणारा ‘रायझिंग स्टार’ बघायला विसरू नका, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेतील विजेते
‘सूर रायझिंग स्टार्स’या स्पर्धेत पीयूष वाघमारे यांनी प्रथम पुरस्कार पटकाविला. द्वितीय पुरस्काराचे मानकरी ठरले यश खेर तर तृतीय पुरस्कार चैतन्य कडू यांनी प्राप्त केला. कार्यक्रमाला सखी मंच व त्यांच्या कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.