सुरेल अंजली, वहिदा रहेमान अन् सुफियाना ब्रजवासी ब्रदर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 10:31 IST2018-03-22T10:28:10+5:302018-03-22T10:31:28+5:30
‘संगीत सम्राट’ व ‘सा रे ग म लिटील चॅम्प्स’चा पुरस्कार जिंकणारी गोड गळ्याची बालगायिका अंजली गायकवाड व मथुरेच्या शास्त्रीय गायनाची परंपरा पुढे चालवणारे ब्रजवासी ब्रदर्स या संगीताच्या भिन्न सुरांना एकाच मंचावर ऐकण्याची संधी नागपूरकरांना लाभली आहे.

सुरेल अंजली, वहिदा रहेमान अन् सुफियाना ब्रजवासी ब्रदर्स
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘संगीत सम्राट’ व ‘सा रे ग म लिटील चॅम्प्स’चा पुरस्कार जिंकणारी गोड गळ्याची बालगायिका अंजली गायकवाड व मथुरेच्या शास्त्रीय गायनाची परंपरा पुढे चालवणारे ब्रजवासी ब्रदर्स या संगीताच्या भिन्न सुरांना एकाच मंचावर ऐकण्याची संधी नागपूरकरांना लाभली आहे.
लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, २३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. अंजली गायकवाड व ब्रजवासी ब्रदर्स सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८चे मानकरी ठरले असून या सोहळयात हे गुणी कलावंत आपली कलाही सादर करणार आहेत.
परिवार चाय प्रस्तुत आणि हिलफोर्ट पब्लिक स्कूल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला असून, ९२.७ बिग एफएम हे रेडिओ पार्टनर तसेच ब्राईट आऊटडोअर हे या कार्यक्रमाचे आऊटडोअर पार्टनर व ग्रीन ट्युन्स हे ग्रीन पार्टनर आहेत.
अंकित तिवारी म्हणेल, सुन रहा हैं ना तू...?
अंकित तिवारी म्हणजे तरुणाईच्या संगीत विश्वातील सुरेल सतार आहे. २०१३ साली रूपेरी पडद्यावर झळकलेल्या आशिकी २ चित्रपटात अंकितने सुन रहा हैं ना तू...हे गीत असे काही गायले की ते विरहाच्या प्राणांतिक वेदनेचे जणू प्रतीक ठरले. अंकित जितका सुरेल गायक तितकाच तो एक प्रतिभावंत संगीतकारही आहे. २०१० सालापासून पार्श्वगायन व संगीत दिग्दर्शन करणारा अंकित सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. त्याला आजवर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक व सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक हे दोन्ही फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. अंकितचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपुरात झाला. त्याच्या कुटुंबाचा कानपुरात एक म्यूजिक ट्रुप आहे. अंकितची आई सुमन तिवारी यासुद्धा गायिका आहेत. अंकितचे आजोबा कृष्ण नारायण तिवारी यांनी अंकित तीन वर्षांचा असतानाच त्याला संगीताचे धडे द्यायला सुरुवात केली. सात वर्षांचा असताना अंकित ढोलक आणि तबला वाजवायला लागला. पुढे विनोद कुमार द्विवेदी यांच्याकडून त्याने शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले. दिवसा तब्बल १२ तास तो रियाझ करायचा. संगीताची ही शिदोरी घेऊन तो पुढे मुंबईत आला आणि चित्रपट संगीताच्या नभातील जणू शुक्रतारा झाला. गलिया तेरी गलिया... या गाण्यासाठी तर त्याला दुसऱ्यांदा फिल्मफेअरने गौरविण्यात आले आहे.
पद्मश्री भावना सोमय्या घेणार पद्मभूषण वहिदा रहमान यांची मुलाखत
या सुरेल कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रपट, संगीत समीक्षक व लेखिका भावना सोमय्या अभिनेत्री पद्मभूषण वहिदा रहमान यांची ३० मिनिटांची मुलाखत घेणार आहेत. भावना सोमय्या या मागील ४० वर्षांपासून हिंदी सिनेमावर लिहित आहेत. त्या स्वत: एक चित्रपट समीक्षक, स्तंभलेखक आहेत. त्यांनी चित्रपटांवर चौफेर लेखन केले असून त्यांची १४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी भारतातील फिल्म सर्टिफिकेटच्या सल्लागार पॅनलवर काम केले आहे आणि सध्या त्या ९२.७ बीगएफएम रेडियो वाहिनीच्या इंटरटेनमेंट एडिटर आहेत. सोमय्या यांना २०१७ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.
कोण आहेत ब्रजवासी ब्रदर्स?
ब्रजवासी ब्रदर्स म्हणजे संगीत साधनेचा चमत्कार आहेत. कृष्णाच्या मथुरेत जन्मलेल्या या चारही भावांच्या आवाजात कृष्णाच्या बासरीइतकाच गोडवा आहे. हुकूम ब्रजवासी यांचे हे चौघे सुपुत्र. मोठ्याचे नाव हेमंत ब्रजवासी, दुसरा अजय, तिसरा होशियार आणि चौथा व सगळयात छोटा चेतन. २००९ साली हेमंत ब्रजवासी याने रियॅलिटी शो सारेगामापा लिटिल चॅम्प्सचा पुरस्कार जिंकून आपली प्रतिभा सिद्ध केली होती. या चारही भावांना हे संगीताचे बाळकडू वारशात मिळाले. या चौघांचे वडील हुकूम ब्रजवासी हे जागरणात गायचे. त्यांनीच सर्वात आधी मोठा मुलगा हेमंत याला शास्त्रीय संगीत आणि लोकगीत गायला शिकविले. आता तर तो सेलेब्रिटी झाला आहे. आॅस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांच्या ग्रुपमध्ये गात आहे. इंडिया गॉट टॅलेंट ही संगीत स्पर्धाही त्याने गाजवली आहे. हेमंतसोबतच अजय, होशियार आणि चेतनही सुंदर गातात. देशभर त्यांच्या गायनाचे विविध कार्यक्रम होत असतात.
पासेससाठी लोकमत कार्यालयात संपर्क करा
४सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ या कार्यक्रमाची नागपूकरांना प्रचंड उत्सुकता आहे. लोकमत सखी मंच व कॅम्पस क्लब सदस्यांसाठी लोकमत कार्यालयात पासेस उपलब्ध असतील. सर्वांनी त्वरित कार्यालयात संपर्क साधून पासेस घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोण आहे अंजली गायकवाड
झी युवा वाहिनीच्या संगीत सम्राट शोमध्ये आपल्या जादुई आवाजाने विजेतेपदावर मोहोर उमटवणारी नगरची कन्या अंजली गायकवाड हिने सा रे ग म प लिटील चॅम्प शोही जिंकला आहे. अंगद आणि मनीषा गायकवाड या दाम्पत्याच्या पोटी २८ फेबु्रवारी २००६ साली अंजलीचा जन्म झाला. तिची मोठी बहीण नंदिनीही गायिका आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच अंजलीने संगीत साधना सुरू केली. वडील अंगद हेच तिचे प्रथम गुरू आहेत. गायकवाड कुटुंब हे मूळचे लातूरचे. पुढे ते अहमदनगर येथे स्थायिक झाले. येथे अंगद गायकवाड यांनी संगीत वर्ग सुरू केले. इतर विद्यार्र्थ्यांसोबत अंजली व नंदिनीही वडिलांकडे संगीताचे धडे गिरवू लागल्या. अंजली पाच वर्षांची असतानाच तिने राज्यस्तरीय भक्तिगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहेमान यांनी तिचा आवाज ऐकून तिला अ बिलियन ड्रीम्स या चित्रपटात गायची संधी दिली. तेव्हापासून सुरू झालेला तिच्या यशाचा प्रवास अविरत सुरूच आहे. अंजलीच्या गायनाचे चाहते देश-विदेशात असून वडील व बहिणीसोबत तिचे वेगवेगळया शहरात सलग कार्यक्रम सुरू असतात.