सुरेल गीतांचा ‘एक प्यार का नगमा है’
By admin | Published: November 16, 2014 12:46 AM2014-11-16T00:46:40+5:302014-11-16T00:46:40+5:30
प्रेम ही शाश्वत भावना आहे. मानवाच्या उत्पत्तीपासून प्रेमाची भावना मानवाला खुणावत आली आहे. युगानुयुगे या भावनेवर कवी, साहित्यिकांनी लिहिले आहे; पण तरीही हा विषय वेगवेगळ्या अंगाने
स्वरतरंग म्युझिक अकादमीच्या कलावंतांचे सादरीकरण : नवोदित गायकांना रसिकांची दाद
नागपूर : प्रेम ही शाश्वत भावना आहे. मानवाच्या उत्पत्तीपासून प्रेमाची भावना मानवाला खुणावत आली आहे. युगानुयुगे या भावनेवर कवी, साहित्यिकांनी लिहिले आहे; पण तरीही हा विषय वेगवेगळ्या अंगाने कलावंतांना भुरळ पाडणारा आहे. कुठल्याही कलाकृतीत प्रेम ही भावना त्या कलाकृतीला अधिक सौंदर्य प्रदान करणारी असते. याच भावनेवर आपल्या चित्रपटसंगीतात अनेक गीतांची रचना झाली. गीतांच्या माध्यमातून प्रेमाच्या विविध छटा सादर करीत नवोदित गायकांनी आज रसिकांची दाद घेतली. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात सादर करण्यात आला.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि मार्गदर्शन स्वरतरंग संगीत अकादमीचे संचालक निरंजन बोबडे यांची होती. ‘एक प्यार का नगमा है’ या शीर्षकाने आयोजित या कार्यक्रमात गायकांनी तयारीने सादरीकरण करून प्रेमाच्या विविध स्वरूपांचे सादरीकरण गीतांच्या माध्यमातून केले. निरंजन यांच्या मार्गदर्शनात तयार होत असलेल्या गायकांनी सफाईने सादरीकरण करताना त्यांच्यातील नवखेपणा अजिबात जाणवू दिला नाही.
गीतांचा आशय आणि स्वर नेमकेपणाने सादर करण्याचा सर्वच गायक-गायिकांचा प्रामाणिक प्रयत्न रसिकांना दाद द्यायला भाग पाडणारा होता. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थनेने करण्यात आला. त्यानंतर भक्ती मराठेने ‘पंख होती तो उड आती रे...’ या उपशास्त्रीय गीताने प्रारंभीच रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या. संजीव भुसारी या ज्येष्ठ गायकाने ‘ख्वाब हो तुम या...’ या गीताने खासी वातावरणनिर्मिती साधली तर लहानग्या आनंद चिमोटेने ‘कुहू कुहू बोले कोयलिया...’ या गीताने आणि गौरी शिंदे यांनी सादर केलेल्या ‘काहे छेड छेड मोहे...’ या गीताने रंगत आणली.
कार्यक्रमात भक्ती मराठे, संजीव भुसारी, आनंद चिमोटे, श्रद्धा तिडोले, राजेश हाके, गौरी शिंदे, वर्षा हेडाऊ, गायत्री मजुमदार, श्रुती शिरोळे, रुचा पांडे, ध्येय चासकर, सुनील लघाटे, नूतन आकोजवार, गौरी आपटे, वासंती गुंडावार, धनश्री पुराणिक, श्रेया खराबे यांनी विविध गीतांचे तयारीचे सादरीकरण करून कार्यक्रमाला उंची प्रदान केली. कार्यक्रमाचे निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले. महेंद्र ढोले यांनी सिंथेसायझरवर तर तबल्यावर श्रीकांत सूर्यवंशी यांनी सुयोग्य साथ केली. (प्रतिनिधी)