दुसऱ्याच्या मदतीला धावणाऱ्या सूरजला मदतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:54 PM2020-01-27T23:54:37+5:302020-01-27T23:59:56+5:30
पत्रकार आणि एक सामाजिक जाणीव असलेला सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्याने आजवर अनेक जणांना मदत केली. कुणाच्याही मदतीसाठी धावून जाणारा संवेदनशील व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरजलाच आज मदतीची गरज आहे. पत्रकार सूरज पाटील किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्रकार आणि एक सामाजिक जाणीव असलेला सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्याने आजवर अनेक जणांना मदत केली. कुणाच्याही मदतीसाठी धावून जाणारा संवेदनशील व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरजलाच आज मदतीची गरज आहे. पत्रकार सूरज पाटील किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे.
सूरज पाटील हा उमरेड रोडवरील विहीरगाव येथील रहिवासी आहे. घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील सूरज हा मागील १४ ते १५ वर्षांपासून पत्रकारितेत आहे. अवघ्या ३५ वर्षाच्या सूरजला किडनीच्या आजाराने ग्रासले आहे. विहीरगाव हे नागपूरला लागून असले तरी ते सर्वसामान्य गावासारखेच गाव आहे. या गावाला सूरजने एक ओळख निर्माण करून दिली आहे. आनंद बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सूरज गावामध्ये अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेतो. या माध्यमातून गावातील तरुण-तरुणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आज या संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी पुढे आलेत. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या परंतु दुर्लक्षित असलेल्या लोकांचा सत्कार दरवर्षी या संस्थेच्या माध्यमातून केला जातो. तसेच गावातील लोकांना चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी म्हणून विविध आरोग्य शिबिर, दंत चिकित्सा शिबिर गावामध्ये आयोजित करण्यात त्याचा पुढाकार असतो. दरवर्षी गावातील लोकांची तो सहलसुद्धा काढतो. एकूण पत्रकारिता करीत असतानाच तो गावातील लोकांसाठीही काम करीत असतो.
पत्रकार असलेला सूरज पाटील आपल्या उदरनिर्वाहासाठी गावात आणि परिसरातील गावांमध्ये पेपर वाटण्याचेही काम करतो. अतिशय कमी वयात त्याला किडनीच्या आजाराने ग्रासले आहे. शंकरनगर येथील एशियन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर डायलेसिस करण्यात येत आहे. सूरजच्या घरी वृद्ध वडील, पत्नी व ३ वर्षाची मुलगी आहे. डायलेसिसचा खर्च मोठा आहे. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. पत्नी एकता हिची धावपळ सुरू आहे. तेव्हा इतरांच्या मदतीसाठी धावून जाणाºया सूरजला आज खºया अर्थाने आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय कार्यातही अग्रेसर
सूरज पाटील हा आपल्या संस्थेच्या मदतीने अनेक सामाजिक कामे करीत असतो. त्याचप्रकारे राष्ट्रीय कार्यातही तो अग्रेसर आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन मोठ्या प्रमाणात साजरा होतो. परंतु त्याच दिवशी सायंकाळी किंवा दुसºया दिवशी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर राष्ट्रध्वज पडल्याचे दिसून येते. सूरज आपल्या आनंद संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज उचलून त्यांचा सन्मान राखण्याचे काम करीत असतो. कालच प्रजासत्ताकदिन पार पडला. यावेळी या कामाची प्रकर्षाने आठवण करण्यात आली.
इच्छुकांनी येथे करावी मदत
सूरजची पत्नी एकता पाटील यांचा मोबाईल क्रमांक ९५११६७५०१५ असा आहे. तसेच त्यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडिया (शाखा दिघोरी) येथे ३६७२५३५०४३ हा खाता क्रमांक आहे आणि आयएफएससी कोड सीबीआयएन नंबर २८४४३१ असा आहे. तेव्हा इच्छुकांनी एकता पाटील यांच्याशी संपर्क साधून किंवा थेट त्यांच्या खात्यात आर्थिक मदत करावी, असे आवाहन आहे.