व्हॅटवर अधिभार; इंधनाच्या किमतीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:23 AM2018-06-04T11:23:32+5:302018-06-04T11:23:41+5:30

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे देशात असंतोष पसरला आहे. त्यातच डिझेलची किंमत भडकल्यामुळे महागाई वाढली असून, दैनंदिन घरगुती वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

Surcharge on VAT; Increase in fuel prices | व्हॅटवर अधिभार; इंधनाच्या किमतीत वाढ

व्हॅटवर अधिभार; इंधनाच्या किमतीत वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देपेट्रोलवर ७१ पैसे व डिझेलवर ५८ पैसे छुपी वाढग्राहकांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे देशात असंतोष पसरला आहे. त्यातच डिझेलची किंमत भडकल्यामुळे महागाई वाढली असून, दैनंदिन घरगुती वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी मे महिन्यात निरंतर १६ दिवस पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढवून ग्राहकांना संकटात टाकले होते. त्यातच राज्य सरकारने व्हॅटवर अधिभार आकारून ग्राहकांना पुन्हा संकटाच्या खाईत लोटले आहे.

व्हीटीएचे पंतप्रधानांना पत्र
यासंदर्भात विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनने (व्हॅट) पंतप्रधान नरेंद्र मोदी, वित्तमंत्री अरुण जेटली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र पाठवून पेट्रोल आणि डिझेलवरील कर मूल्य निर्धारित करण्याची विनंती केली आहे. व्हीटीएचे अध्यक्ष जे.पी. शर्मा यांनी सांगितले की, १० मे २०१८ रोजी पेट्रोलवर २३.०१ रुपये व्हॅट आकारणी करण्यात येत होती. त्यात १५ मे रोजी ६ पैसे अधिभार आकारून व्हॅट २३.०७ रुपये, २१ मे रोजी पुन्हा ०.३८ पैशांची वाढ करून व्हॅट २३.३९ रुपये आणि त्यानंतर २८ मे रोजी पुन्हा ०.७१ पैसे अधिभार आकारल्याने आता पेट्रोलवर २३.७२ रुपये व्हॅट वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे २८ मे रोजी पेट्रोलची किंमत ८५.९८ रुपयांवर पोहोचली होती. अशीच वाढ डिझेलमध्येही झाली. १० मे रोजी डिझेलवर १२.४३ रुपये व्हॅट आकारणी व्हायची. त्यानंतर १५ मे रोजी ८ पैसे, २१ मे रोजी ०.३४ पैसे आणि २८ मे रोजी व्हॅटवर पुन्हा ०.५८ पैसे अधिभार आकारला. त्यामुळे डिझेलवरील एकूण व्हॅट १३.०२ रुपयांवर गेला आहे. त्यामुळे २८ मे रोजी डिझेलची किंमत ७२.४५ रुपयांवर गेली.
शर्मा म्हणाले, अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार (पेट्रोलवर ८.५० रुपये व डिझेलवर ६.५० रुपये) सर्वाधिक आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. सरकारने दोन्ही इंधनावरील करात कपात करून ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी शर्मा यांनी केली.

करात कपात करा
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताच आॅक्टोबर २०१७ मध्ये केंद्र सरकारने अबकारी करात दोन रुपयांची कपात केली होती. पण कच्च्या तेलाच्या किंमतीत होणाऱ्या निरंतर वाढीमुळे कर कपातीचा ग्राहकांना विशेष फायदा झाला नाही. केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक कराची निश्चिती करून ग्राहकांना दिलासा द्यावा असे व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी स्पष्ट केले आहे.

२० दिवसात ३.५० रुपये दरवाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत निरंतर वाढ झाल्यामुळे मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकल्या. २० दिवसांत दोन्ही इंधनाच्या किमतीत प्रति लिटर सुमारे ३.५० रुपये वाढ झाली. त्याचा थेट लाभ राज्याला पेट्रोलवर ७१ पैसे आणि डिझेलवर ५८ पैसे अतिरिक्त व्हॅट आकारून मिळाला. त्यामुळे राज्याच्या महसुलात अतिरिक्त वाढ झाल्याची नोंद आहे.

Web Title: Surcharge on VAT; Increase in fuel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.