संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी - सुरेश द्वादशीवार
By प्रविण खापरे | Published: February 20, 2023 08:24 PM2023-02-20T20:24:08+5:302023-02-20T20:24:39+5:30
संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी असे सुरेश द्वादशीवार यांनी म्हटले.
नागपूर : महाराष्ट्रात संवेदनशील आणि मने जुळणारे लेखन फार कमी झाले आहे आणि ज्यांनी असे लेखन केले, त्यांत सर्वांत अग्रस्थानी ज्यांचे नाव घ्यायला हवे त्या आशा बगे असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिक व विचारक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे व्यक्त केली. ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने जनस्थान पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने विदर्भ गौरव प्रतिष्ठान व आधार बहुद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गिरीश गांधी होते तर व्यासपीठावर हेमंत काळीकर, डॉ. अविनाश रोडे, बाळ कुळकर्णी, निलेश खांडेकर उपस्थित होते.
आशा बगे यांनी पारंपारिकता जपतानाच आधुनिकेतची कास कधीच सोडली नाही. स्वभावाची सात्विक, सोज्वळ छाप असलेल्या त्यांच्या लिखाणामध्ये अतिशय समर्पकरित्या पारंपरिकतेची आधुनिकतेची सांगड घातल्याचे दिसून येते, अशा शब्दात प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी भावना व्यक्त केल्या. आशाताईंना साहित्य अकादमीनंतर जनस्थान पुरस्कार मिळणे ही केवळ नागपूरच नाही तर विदर्भाच्या साहित्यिक विश्वासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे डॉ. गिरीश गांधी अध्यक्षस्थानाहून म्हणाले. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले तर आभार बाळ कुळकर्णी यांनी मानले. प्रेक्षकांमध्ये ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, डॉ. कुमार शास्त्री, सुनिती देव यांच्यासह साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
लेखिकाच मागे का? - आशा बगे
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराच्या गेल्या १७ वर्षाच्या काळात केवळ दोन-तिन लेखिकांनाच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीही लेखिकांना नगण्य स्थान मिळाले आहे. हे असे का? की लेखिकांची दखल घेतली जात नाही? असे प्रश्न आशा बगे यांनी सत्काराला उत्तर देताना यावेळी उपस्थित केले.