खून करणाऱ्या सुरेश मंचलवारला १० वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:12 AM2021-08-23T04:12:09+5:302021-08-23T04:12:09+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून करणारा आरोपी सुरेश वामन मंचलवार याला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून करणारा आरोपी सुरेश वामन मंचलवार याला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
व्यवसायाने मजूर असलेला मंचलवार डायमंडनगर येथील रहिवासी आहे. ९ ऑगस्ट २०१६ रोजी सत्र न्यायालयाने त्याला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेप व १००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध मंचलवारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता अपील अंशत: मंजूर करून सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला आणि मंचलवारला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंड कायम ठेवण्यात आला.
मयताचे नाव संदीप चौधरी होते. ही घटना २५ मे २०१५ रोजी नंदनवन पोलिसांच्या हद्दीत घडली होती. आरोपी व मयत शेजारी राहत होते. दोघांचेही एकमेकांच्या घरी जाणेयेणे होते. घटनेच्या दिवशी ते एकत्र दारु प्याले. दरम्यान, त्यांचे भांडण झाले. भांडण वाढल्यानंतर आरोपीने चौधरीचा चाकू भोसकून खून केला. चौधरीची पत्नी बाहेरून घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती.