संरक्षित जंगलावर चालली कुऱ्हाड

By admin | Published: January 20, 2017 02:21 AM2017-01-20T02:21:21+5:302017-01-20T02:21:21+5:30

सरकारतर्फे जंगलाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोट्यवधीचा खर्च केला जात आहे.

Surfing on the protected forest | संरक्षित जंगलावर चालली कुऱ्हाड

संरक्षित जंगलावर चालली कुऱ्हाड

Next

२०० वर सागाच्या झाडांची अवैध कटाई : कसे वाचणार जंगल?
जीवन रामावत   नागपूर
सरकारतर्फे जंगलाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोट्यवधीचा खर्च केला जात आहे. शेकोटीसारखे उपक्रम राबविले जात आहे. मात्र त्याचवेळी स्वत: जंगलाचा रखवालदार असलेला वन अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या संमतीने संरक्षित जंगलावर कुऱ्हाड चालविली जात आहे. नागपूरशेजारच्या कोंढाळी वन परिक्षेत्रात अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे.
या वन परिक्षेत्रातील मूर्ती बिटामधील खसरा क्रमांक १५४ या संरक्षित जंगलातील सुमारे २०० सागाच्या झाडांची अवैध कटाई झाली आहे. विशेष म्हणजे, या झाडांच्या कटाईला स्वत: येथील वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत हुमने यांनी रीतसर लेखी परवानगी दिली असल्याचे सांगितले जात आहे. त्यावर टावरी नावाच्या एका खाजगी ठेकेदाराने ही कटाई केली आहे. माहिती सूत्रानुसार मूर्ती येथील शेतकरी प्रवीण मन्ने यांचे खसरा क्र. १५५/३ येथे शेती आहे. शिवाय त्याशेजारी खसरा क्र. १५४ हे वन विभागाच्या मालकीचे संरक्षित जंगल आहे. संबंधित शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी १५५/३ मधील झाडे कटाईची वन विभागाकडे परवानगी मागितली. त्यावर आरएफओ प्रशांत हुमने यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी न करता, त्या शेतकऱ्याला झाडे कटाईची परवानगी दिली. एवढेच नव्हे, तर वन विभागाच्या सर्वेअरने सुद्धा नकाशाची पाहणी न करता खसरा क्र. १५५/३ शेजारी वन विभागाचा कोणतेही जंगल नसल्याचे रीतसर प्रमाणपत्र दिले. याचा फायदा घेऊन संबंधित ठेकेदाराने खसरा क्र. १५५ सह वन विभागाच्या खसरा क्र. १५४ च्या संरक्षित क्षेत्रातील २०० वर सागाच्या झाडांचा सफाया केला. दरम्यान शेजारच्या एका दुसऱ्या शेतकऱ्याने यासंबंधी नागपूर वन विभागाकडे केलेल्या तक्रारीवरू न या संपूर्ण घटनेचा भंडाफोड झाला. यानंतर वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, प्रथमदर्शनी वन विभागाच्या संरक्षित जंगलातील मोठमोठ्या २०० वर सागाच्या झाडांची कटाई झाली असल्याचे दिसून आले. यामुळे अख्खा वन विभाग खडबडून जागा झाला असून, प्रकरणाच्या चौकशीला लागला आहे. अवैध वृक्ष कटाई वन विभागासाठी नवीन नसून, काही खाजगी ठेकेदारांचा वन अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा नेहमीचाच उद्योग झाला आहे. परंतु अशा घटनांनी पुन्हा एकदा जंगलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अवैध कटाई झाली...
आतापर्यंतच्या चौकशीतून वन विभागाच्या संरक्षित जंगलातील दोनशेवर सागाच्या झाडांची कटाई झाली असल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. निश्चितच हा गंभीर गुन्हा आहे. मात्र हा सर्व नकाशामुळे घोळ झाला असावा. मागील १ जानेवारी २०१६ रोजी काटोल येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी एक आदेश पारित करून येथील नकाशात काही दुरुस्ती केली असल्याचे दिसून येते. तो प्रचलित नकाशा आहे. त्यानुसार खसरा क्र. १५४ मधील काही क्षेत्र शेतकऱ्याच्या खसरा क्र. १५५ मध्ये दाखविण्यात आले असावे. शिवाय वन विभागाकडे १९११-१२ चा नकाशा आहे. त्या नकाशानुसार खसरा क्र. १५४ हा वन विभागाचा संरक्षित जंगल आहे. त्यामुळे नकाशाचा हा घोळ दूर करण्यासाठी वन विभागाने काटोल येथील एसडीओकडे काही दस्तऐवजांची मागणी केली आहे. ते दस्तऐवज प्राप्त झाल्यानंतर, नेमका काय प्रकार घडला, हे स्पष्ट होईल. मात्र सकृतदर्शनी वन विभागाच्या संरक्षित जंगलातील सागाच्या झाडांची अवैध कटाई झाली असल्याचे दिसून येत आहे.
- संदीप क्षीरसागर, सहायक वनसंरक्षक, नागपूर

Web Title: Surfing on the protected forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.