निळ्या पडलेल्या दोन दिवसाच्या बाळावर शस्त्रक्रिया; हृदयाची रक्तवाहिनी फुफ्फुसाला जोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 07:50 PM2022-04-11T19:50:27+5:302022-04-11T20:10:29+5:30

Nagpur News अवघ्या दोन दिवसांच्या निळ्या पडलेल्या नवजात बाळावर शस्तक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यात नागपुरातील डॉक्टरांना यश आले.

Surgery on a two-day-old baby lying blue; The blood vessels of the heart connect to the lungs | निळ्या पडलेल्या दोन दिवसाच्या बाळावर शस्त्रक्रिया; हृदयाची रक्तवाहिनी फुफ्फुसाला जोडली

निळ्या पडलेल्या दोन दिवसाच्या बाळावर शस्त्रक्रिया; हृदयाची रक्तवाहिनी फुफ्फुसाला जोडली

Next
ठळक मुद्दे१७ दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी

नागपूर : हृदयाकडे येणारे रक्त शुद्धीकरणासाठी फुफ्फुसाकडे पाठविण्याऐवजी प्रणालीगत रक्ताभिसरणात विचलित व्हायचे. यामुळे दोन दिवसाच्या नवजात शिशूला श्वास घेणे कठीण झाले होते. त्याचे संपूर्ण शरीर निळसर पडले होते. बाळाची गंभीर प्रकृती पाहता डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. हृदयाची रक्तवाहिनी फुफ्फुसाला जोडण्याची शस्त्रक्रिया केली, सोबतच १७ दिवस बाळावर विशेष उपचार करत बाळाचे प्राण वाचविले.

नागपुरातील एका महिलेने २३ मार्च रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचे वजन सव्वा दोन किलो होते. परंतु, बाळाला जन्मत: हृदयविकार होता. २४ मार्च रोजी नातेवाईक बाळाला घेऊन ‘कार्डियन’ रुग्णालयात आले. हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. निकुंज पवार यांनी तपासून ‘कन्जनायटल सायनोटिक हार्ट डिसीज’चे निदान केले. डॉ. पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, हृदय रक्ताला फुफ्फुसांपर्यंत पोहोचवते. येथून रक्ताला ऑक्सिजन मिळतो आणि मग ऑक्सिजनयुक्त रक्त पुन्हा हृदयाकडे येते. हृदय, फुफ्फुस किंवा रक्तामध्ये काहीही समस्या निर्माण झाल्यास रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, यामुळे त्वचेचा रंग निळा पडू लागतो. या बाळामध्ये हृदयाचे रक्त फुफ्फुसांपर्यंत जाणारा रक्ताचा प्रवाह कमी होता आणि पूर्ण शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचत नव्हते. यामुळे बाळाला श्वास घेता येत नव्हता. त्याचा जीव धोक्यात होता. नातेवाईकांच्या संमतीने तातडीने हृदयाची रक्तवाहिनी फुफ्फुसाला जोडण्याची शस्त्रक्रिया केली. याला वैद्यकीय भाषेत ‘बी. टी. शंट’ शस्त्रक्रिया म्हणतात.

शस्त्रक्रियेनंतर फुफ्फुसे बंद पडण्याचा धोका होता

डॉ. पवार म्हणाले, बाळावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी पुढील काही दिवस महत्त्वाचे होते. यात त्याच्या ‘न्युट्रिशियन्स’ची समस्या होती. बाळ थंड पडण्याची भीती होती व फुफ्फुस बंद पडण्याचा धोका होता. परंतु, रुग्णालयातील आवश्यक सोयी-सुविधा व अनुभवी मनुष्यबळामुळे सलग १७ दिवसांच्या उपचारानंतर बाळ धोक्याबाहेर आले.

दीड-दोन वर्षानंतर पुन्हा शस्त्रक्रिया

दीड-दोन वर्षानंतर या बाळावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल. यात हृदयात असलेले छिद्र बंद केले जाईल. शिवाय, हृद्यातून फुफ्फुसाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीचा आकार मोठा केला जाईल.

- डॉ. निकुंज पवार, हृदय शल्यचिकित्सक

Web Title: Surgery on a two-day-old baby lying blue; The blood vessels of the heart connect to the lungs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य