शस्त्रक्रिया रखडल्या, रुग्णांना फटका

By admin | Published: March 21, 2017 01:40 AM2017-03-21T01:40:13+5:302017-03-21T01:58:11+5:30

धुळे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद येथील निवासी डॉक्टरांना मारहाणीचे प्रकरण निवळत नाही, ...

Surgery stops, patients suffer | शस्त्रक्रिया रखडल्या, रुग्णांना फटका

शस्त्रक्रिया रखडल्या, रुग्णांना फटका

Next

मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन
नागपूर : धुळे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद येथील निवासी डॉक्टरांना मारहाणीचे प्रकरण निवळत नाही, तोच सोमवारी सकाळी पुणे येथील वाढिया रुग्णालयात पुन्हा एका डॉक्टरवर हल्ला झाला. यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले असून सुरक्षेचा मुद्दा रेटून धरत सोमवार सकाळी ८ वाजेपासून कामबंद आंदोलन सुरू केले. परिणामी, नागपूरच्या मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ५० टक्के शस्त्रक्रिया रखडल्या. हे आंदोलन आणखी काही दिवस चालल्यास या तीनही रुग्णालयात रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ३४७ निवासी डॉक्टर असून सोमवारी २८४ डॉक्टर कामबंद आंदोलनात सहभागी झाले. जोपर्यंत रुग्णालयात सुरक्षेच्या प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कामावर अनुपस्थित राहू, अशी अट घालत स्वाक्षऱ्यांचे पत्र आज दुपारी अधिष्ठात्यांना दिले. परिणामी, बाह्यरुग्ण विभागापासून ते अपघात विभाग व वॉर्डात कधी नव्हे ते वरिष्ठ डॉक्टर सेवा देताना दिसून आले. शासकीय रुग्णालयाचा कणा असलेले निवासी डॉक्टरच आज कामावर गैरहजर असल्याने वेळेवरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या व फारच गंभीर रुग्णांना वॉर्डात भरती करण्यात आले. असे असले तरी रुग्णालय प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे ४० महत्त्वाच्या शस्त्रक्रिया झाल्या. तर बाह्यरुग्ण विभागात २८३३ रुग्णांना तपासून ९२ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. मात्र डॉक्टरांचे आंदोलन आणखी काही दिवस चालल्यास रुग्णसेवा प्रभावित होण्याचे खुद्द वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी सुरक्षेच्या मुद्याला घेऊन सोमवारी दुपारी अधिष्ठाता कक्षासमोर जोरदार नारेबाजी केली. रुग्णालयात काम करीत असताना असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने गैरहजर राहत असल्याच्या स्वाक्षरीचे पत्रही अधिष्ठात्यांना दिले. मेयोतही निवासी डॉक्टरांनी हल्ल्याचा निषेध करीत सुरक्षा वाढविण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, निवासी डॉक्टरांनी हे आंदोलन व्यक्तिगतस्तरावर घेतले असून यात ‘मार्ड’ संघटनेचा हस्तक्षेप नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
मेयोत ‘मायनर’ शस्त्रक्रियांना बसला फटका
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) १५० निवासी डॉक्टरांपैकी ११० डॉक्टर कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. रुग्णालयात रोज सुमारे ३०वर महत्त्वाच्या तर ४०वर किरकोळ शस्त्रक्रिया होतात. परंतु निवासी डॉक्टरांच्या आंदोलनामुळे केवळ २० महत्त्वाच्या शस्त्रक्रिया झाल्या, तर एकही किरकोळ शस्त्रक्रिया झाली नाही.

‘सुपर’मधील अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टी ठप्प
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील वरिष्ठ निवासी डॉक्टरही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे या रुग्णालयात सोमवारी कश्यातरी तीन शस्त्रक्रिया होऊ शकल्या. मात्र, एकही अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी झाली नाही. यामुळे हृदयरोग रुग्णांना मोठा फटका बसला. मंगळवारीही कामबंद आंदोलन राहिल्यास या व इतरही शस्त्रक्रिया रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Surgery stops, patients suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.