‘ईडी’कडून ‘सर्जिकल स्ट्राइक’, पंकज मेहाडिया प्रकरणात छापे; उद्योजकांमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 10:37 AM2023-03-04T10:37:16+5:302023-03-04T10:38:33+5:30
सनविजयचे संचालक संजय अग्रवाल, बिल्डर अग्रवाल बंधूंसह १३ ठिकाणी कारवाई
नागपूर : पंकज मेहाडिया घोटाळ्यात ईडीने शुक्रवारी सकाळी बिल्डर, कोळसा व्यापारी यांच्यासह १३ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईमुळे नागपूरच्या उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. या छाप्यात ईडीला रोख रक्कम आणि मोठ्या प्रमाणात कागदपत्रे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या छाप्यांमुळे नागपुरातील उद्योग वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तीन वर्षांअगोदर पंकज मेहाडिया प्रकरण समोर आले होते. कमी किमतीत स्टील मिळवून देण्याच्या बहाण्याने पंकज मेहाडियाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती. 'लोकमत'ने हा प्रकार उघडकीस आणला होता. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने पंकज मेहाडिया, लोकेश जैन आणि कार्तिक जैन यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणामध्ये पंकजला अटक करण्यात आली होती, तर इतर जैन बांधवांना न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला होता. मार्च २०२१ मध्ये ईडीच्या नागपूर युनिटने या प्रकरणी ईसीआर नोंदवला होता. तेव्हापासून ईडी या प्रकरणाच्या तपासात गुंतली आहे.
ईडीच्या पथकाने शुक्रवारी पहाटे आरोपी पंकज मेहाडिया, लोकेश जैन, कार्तिक जैन, सनविजय स्टीलचे संचालक संजय अग्रवाल, आर. के. संदेश ग्रुपचे बिल्डर रामदेव अग्रवाल, त्यांचा भाऊ दिलीप अग्रवाल, चंद्रा कोलचे संजय अग्रवाल, व्हायब्रंट ग्रुपचे विनोद गर्ग, राजेश स्टील अँड वायरचे सुरेश बाजोरिया आणि सीए अनिल पारेख यांच्याकडे छापे टाकण्यात आले.
ईडीच्या मुंबई युनिटचे अधिकारी गुरुवारीच नागपुरात पोहोचले होते. त्यांनी पहाटे पाच वाजता नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कारवाईला सुरुवात केली. नागपुरात ११ ठिकाणी, तर मुंबईत दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. कारवाईदरम्यान ईडीला लाखो रुपयांची रोकड आणि कागदपत्रे मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज मेहाडिया प्रकरणाशी नागपुरातील काही उद्योजकांची ‘लिंक’ आहे. ईडीने सखोल चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ शकतात. ईडीचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत कारवाईत व्यस्त होते. ‘ईडी’ने यासंदर्भात कुठलेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत कुठलीही माहिती देण्यास नकार दिला.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या तपासात पंकज मेहाडियाने ५०० कोटींहून अधिक रुपयांची हेराफेरी केल्याची बाब उघड झाली आहे. पंकजचे नागपुरातील अनेक उद्योजकांशी संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे ते लोकदेखील ईडीच्या रडारवर आले.