अज्ञानामुळे मागितले जातात सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे :एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:35 AM2019-04-06T00:35:59+5:302019-04-06T00:36:42+5:30
वायुसेनेचे निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी सैन्यदलाबाबत असलेल्या अज्ञानामुळे ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागितले जात असल्याची भावना शुक्रवारी एका कार्यक्रमात व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वायुसेनेचे निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी सैन्यदलाबाबत असलेल्या अज्ञानामुळे ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागितले जात असल्याची भावना शुक्रवारी एका कार्यक्रमात व्यक्त केली.
अहिल्या मंदिर, धंतोली येथे आयोजित व्याख्यानात ते म्हणाले, ‘सर्जिकल स्ट्राईक’ ही सोपी गोष्ट नाही. अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे अशी कारवाई केली जाऊ शकते. मिळालेली माहिती आणि अनुभवाच्या आधारे कारवाईबाबत अंदाज व्यक्त करताना त्यांनी सांगितले, २६ फेब्रुवारीला संबंधित बालाकोट या ठिकाणी जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी गोळा असल्याची गुप्त माहिती वायुसेनेला मिळाली. कदाचित इस्रायली सॅटेलाईटच्या माध्यमातून भारतीय सॅटेलाइट ‘रिसॅट-२’ ला ही माहिती प्राप्त झाली आणि तिथून ती वायुसेनेपर्यंत पोहचली. त्यानुसार ‘मिराज २०००’ ला निर्देश देण्यात आले. या माहितीचे १५ मिनिटात आदानप्रदान झाले असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. रात्री कारवाई करणे कठीण असतानाही भारतीय वायुसेनेने माहितीच्या आधारे तंतोतंत कारवाई फत्ते केल्याचा दावा चाफेकर यांनी केला. ठरलेल्या लक्ष्यावर मिसाईलने मारा करण्यात आला. मिसाईलच्या माऱ्यामुळे खड्डा पडतो आणि तेथील सर्वकाही नष्ट होते. त्याचे सॅटेलाईट इमेज मिळणे शक्य नसते. मात्र या सर्व गोष्टी आणि सैन्यदलातर्फे चालणाऱ्या कारवायांबाबत लोकांमध्ये अज्ञान असल्याने ते एअर स्ट्राईकचे पुरावे विचारत असल्याची टीका त्यांनी केली. आपला देश शांतताप्रिय आहे व वाद नको असतात. शिवाय निर्णय घेण्यामध्येही लकवा मारल्यासारखी स्थिती होती. मात्र यावेळी वायुसेनेद्वारे घेण्यात आलेल्या कारवाईचा निर्णय धाडसी होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पुलवामा हल्ल्यात आरपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतरआर्थिक, धोरणात्मक आणि सैन्यस्तरावर दबाव बनविण्याचे पर्याय भारताजवळ होते. भारताने वायुसेनेची निवड करून मोठी गोष्ट साधल्याचे मनोगत व्यक्त करीत ही कारवाई भविष्यात येणाºया शासनाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वास चाफेकर यांनी व्यक्त केला.
अमेरिका स्वत:चा कमीपणा लपवितो
पाकिस्तानचे एफ -१६ हे युद्धविमान भारताने मारलेच नसल्याचा दावा अमेरिकेतर्फे नुकताच केला गेला. त्यामुळे याबाबत संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. मात्र एफ-१६ हे विमान अमेरिकेनेच पाकिस्तानला दिले आहे आणि जगभरात त्याचा व्यापार ते करतात. त्यामुळे हे विमान पाडल्याचा दावा केल्याने त्यांच्या विमानाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित होतो. ही कमतरता लपविण्यासाठीच त्यांच्याकडून असा दावा केला जात असल्याचे मत सूर्यकांत चाफेकर यांनी व्यक्त केले.