आदिवासी मुलांमध्ये विद्येची ज्योत पेटविणारे ‘सरजी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:07 AM2021-07-23T04:07:03+5:302021-07-23T04:07:03+5:30
योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासींच्या मुलांना विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या शिक्षणाचा ...
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासींच्या मुलांना विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणे हेच त्यांचे जणू व्रत. बँकेची चांगली नोकरी सोडली, शहरातील सर्व सुखांचा त्याग केला अन् काही वर्षांअगोदर थेट नर्मदाकाठी असलेला इंजिनियर भूमचैतन्य बाबांचा आश्रम गाठला. गुरुची सेवा करणे हेच ध्येय अन् त्यातूनच निर्माण झालेली त्यांची ‘सरजी’ ही ओळख. आदिवासी पाड्यातील मुलांमध्ये विद्येची ज्योत पेटविणे हेच मिशन डोळ्यासमोर ठेवून अक्षरश: त्यासाठी झोकून काम करणाऱ्या विजय शेटे यांनी समाजासमोर अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
एका राष्ट्रीयीकृत बँकेत काम करत असताना अॅथ्लेटिक्सचे ज्येष्ठ प्रशिक्षक भाऊ काणे यांचे मार्गदर्शन लाभले अन् विजय शेटे यांना पदवी शिक्षण पूर्ण करता आले. त्यानंतर भाऊ काणे यांच्या मार्गदर्शनात ते मध्य प्रदेशातील मंडलाजवळील इंजिनियर भूमचैतन्य बाबांच्या आश्रमाशी जुळले. दोघेही विजय शेटे यांना गुरुस्थानीच होते व अध्यात्मात त्यांना समाधान लाभत होते. समाजासाठी काहीतरी करायचे या विचारातून शेटे यांनी निवृत्तीच्या सहा वर्षाअगोदरच सेवानिवृत्ती घेतली अन् आश्रमासाठी सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली.
आश्रमात २०१५ साली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानोदय विद्यामंदिर ही शाळा सुरू करण्यात आली होती व २०१८ साली शेटे यांच्याकडे शाळेची जबाबदारी आली. अगोदर शिकविण्याचा अनुभव नसला तरी आदिवासी विद्यार्थ्यांशी ते एकरूप झाले होते. या मुलांमध्ये विद्येची ज्योत पेटली पाहिजे व त्यांना सुविधा मिळायला हव्या या जिद्दीतून त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली. भाऊ काणे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी शाळेसाठी इमारतदेखील उभारली व आजच्या तारखेत तेथे ९० हून अधिक आदिवासी मुले-मुली शिक्षण घेत आहेत. दुर्गम भागात संगणकाचीदेखील ओळख ते करुन देत आहेत. विशेष म्हणजे त्यातील दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठीदेखील निवड झाली आहे. या मुलांना पाचवीहून पुढे शिक्षणासाठी वर्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
गुरुंचीच प्रेरणा अन् त्यांचेच आशीर्वाद
विजय शेटे यांना सर्व जण ‘सरजी’ म्हणून ओळखतात. सर्वसामान्य व्यक्ती दोन दिवसाहून अधिक काळ पाड्यांमध्ये राहू शकत नाही. विजय शेटे यांनी मात्र सुखवस्तू आयुष्याच्या त्याग तर केलाच शिवाय तेथील मुलांनादेखील शिक्षणाच्या प्रवाहात आणायला सुरुवात केली. आश्रमाने माझ्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडले. माझ्या गुरुंनी माझ्यावर जे संस्कार केले त्यातूनच मला प्रेरणा व दिशा मिळते. त्यातूनच आदिवासी मुलांसाठी काम करण्याचे बळ मिळत आहे, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.