आश्चर्य : जन्मत: बालकाच्या पोटात गर्भ : मेडिकलमध्ये आढळली तीन प्रकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 11:55 PM2020-02-06T23:55:18+5:302020-02-06T23:57:37+5:30
जन्मत: बालकाच्या पोटात गर्भ वाढणे हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण. मात्र, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एक नव्हे तर तब्बल तीन प्रकरणे आढळून आलीत. वैद्यकीय भाषेत याला ‘फिट्स इन फिटू’ म्हटले जाते.
सुमेध वाघमारे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जन्मत: बालकाच्या पोटात गर्भ वाढणे हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण. मात्र, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एक नव्हे तर तब्बल तीन प्रकरणे आढळून आलीत. वैद्यकीय भाषेत याला ‘फिट्स इन फिटू’ म्हटले जाते. या तिन्ही प्रकरणात एक वर्षाच्या आतील बालकांचा समावेश होता. त्यांच्या पोटात भ्रूणाचा पाटीचा मणका, हात-पायाचे हाड, डोळे व डोक्याचा अविकसित भाग होता. मेडिकलच्या पेडियाट्रिक सर्जरी विभागात या तिन्ही बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान देण्यात आले.
साधारण पाच लाख बालकांमध्ये ‘फिट्स इन फिटू’ चे एक प्रकरण समोर येते. मेडिकलमध्ये सर्वप्रथम हे प्रकरण २००८ मध्ये नंतर २०१२ मध्ये व २०१९मध्ये आढळून आले. पहिली दोन्ही प्रकरणे विदर्भातील होती तर तिसरे प्रकरण मध्य प्रदेशातील होते. यात सात ते नऊ वर्षे दरम्यानच्या या बालकांना त्याच्या आईवडिलांनी पोट फुगलेल्या अवस्थेत मेडिकलला दाखल केले होते. दूध घेत नाही. श्वास घेण्यास कठीण होत असल्याचे, वारंवार उलटी करीत असल्याचे व शौच करीत नसल्याच्या आईवडिलांच्या तक्रारी होत्या. बाळाच्या पोटत गर्भ असल्याचे त्यांना माहीतही नव्हते. डॉक्टरांनी तपासणी करून याची माहिती नातेवाईकांना दिल्यावर त्यांना धक्काच बसला.
जोखमीची शस्त्रक्रिया
एक वर्षाच्या आतील बालकांवर ही मोठी शस्त्रक्रिया करून अविकसित गर्भ बाहेर काढणे जोखमीचे असते. परंतु अनुभव व कौशल्याचा आधारावर या तिन्ही बालकांवर पेडियाट्रिक सर्जन डॉ. राजेंद्र सावजी, सहयोगी प्राध्यापक डॉ. नीलेश नागदेवे यांच्यासह बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. नरेश तिरपुडे, डॉ. वृशाली अंकलवार व डॉ. करुणा वानखेडे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून नवे जीवन दिले.
असे आहे, यामागील कारण
पेडियाट्रिक सर्जरी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नीलेश नागदेवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, अशा प्रकरणात बीजांड (झायगोट) दोन सारख्या भागात विभागले जाते. यातील एक आईच्या नाळेशी जुळून राहत असल्यानेच त्या भ्रूणचा विकास होतो. दुसऱ्या भ्रूणची नाळ निरोगी भ्रूणच्या ‘एवोटा’शी (मोठी रक्तवाहिनी) जुडलेली असते. यामुळे त्याचा विकास होत नाही. अविकसित भ्रूण निरोगी भ्रूणमध्ये शिरतो. गर्भवती महिलेची सोनोग्राफी केल्यास याचे निदान होते. परंतु या तिन्ही प्रकरणात तशी तपासणी झाली नव्हती. मूल जन्माला आल्यानंतर आणि त्रास वाढल्यानंतर हे प्रकरण समोर आले.
गर्भात आढळला पाठीचा मणका, हातापायाचे हाड व डोळा
या तिन्ही प्रकरणामध्ये बालकांच्या पोटातील गर्भात पाठीचा मणका, हातपायाचे हाड, डोळा, कवटीचा भाग, केस आढळून आले होते. म्हणूच याला ‘फिट्स इन फिटू’ म्हटले जाते. ज्यात हे आढळून येत नाही त्याला शास्त्रीय भाषेत ‘टेरॅटॉमा’ म्हटले जाते. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात अशा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणावरही मेडिकलमध्ये यशस्वी उपचार होत असल्याचे डॉॅ. नागदेवे यांनी सांगितले.