चेंजिंग रूम तपासण्यासाठी नागपुरात आता सरप्राईज स्क्वॉड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:16 PM2019-08-12T12:16:08+5:302019-08-12T12:17:42+5:30
मॉल्स, शॉप्समध्ये आकस्मिक भेट देऊन तेथील चेंजिंग रूम तपासण्यासाठी विशेष तपास पथक निर्माण करण्याची तयारी केली आहे. परिमंडळ-२ मधील कुठल्याही मॉल, शॉप, शोरूम किंवा दुकानांना भेट देतील आणि तेथील चेंजिंग रूमची तपासणी करतील.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीताबर्डीत उघडकीस आलेल्या चेंजिंग रूम प्रकरणाची पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनी गंभीर दखल घेतली आहे. असे गंभीर गैरप्रकार रोखण्यासाठी एक विशेष तपास पथक तयार करून विविध मॉल, शॉप्स आणि अन्य आस्थापनांना आकस्मिक भेट देऊन हे पोलीस पथक तेथील चेंजिंग रूमची तपासण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
विकत घेतलेला तयार ड्रेस कसा दिसतो, तो सैल किंवा फिट तर नाही ना, हे तपासण्यासाठी प्रत्येक कपड्याच्या दुकानात चेंजिंग रूम असतात. पुरुषांबाबत कधी काही प्रॉब्लेम नसतो. मात्र, महिला-मुलींच्या चेंजिंग रूममध्ये काही विकृत मानसिकतेचे व्यक्ती छुपे कॅमेरे किंवा मोबाईल दडवून ठेवतात. चेंजिंग रूममध्ये गेलेली महिला, तरुणी कपडे बदलवीत असताना छुपा कॅमेरा किंवा मोबाईलमधून तिचा अश्लील व्हिडीओ तयार केला जातो. विकृत मानसिकतेचे व्यक्ती या व्हिडीओतून अनेकदा संबंधित महिला-मुलीला ब्लॅकमेल करतात. ठिकठिकाणी असे गैरप्रकार घडले आहेत. नागपुरात अशाप्रकारे व्हिडीओ तयार करण्याच्या घटना पाच ते सात वर्षांपूर्वी उघडकीस आल्या होत्या. त्याचा बोभाटाही झाला होता. त्यामुळे नागपूरसह ठिकठिकाणच्या पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली. परिणामी गेल्या काही महिन्यात अशा घटना पुढे आल्या नव्हत्या. शुक्रवारी ९ आॅगस्टच्या रात्री सीताबर्डीतील फ्रेण्डस् नामक कपड्याच्या दुकानातील लेडिज चेंजिंग रूममध्ये पुन्हा हा विकृत प्रकार उघडकीस आला. रूममध्ये मोबाईल लपवून कपडे बदलविणाऱ्या युवतीचा अश्लील व्हिडीओ बनविला गेल्याचे त्यातून उघडकीस आले. सीताबर्डी ठाण्यात त्याचा गुन्हा दाखल झाला अन् दुकानमालक किसन इंदरचंद अग्रवाल तसेच निखील ऊर्फ पिंटू दीपक चौथमल या दोघांना अटकही झाली. त्यामुळे मॉल, शॉप्समधील चेंजिंग रूम पुन्हा एकदा चर्चेला आल्या आहेत. महिला-मुलींमध्ये त्यासंबंधाने असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ते लक्षात घेता परिमंडळ-२ च्या पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी हा गैरप्रकार रोखण्यासाठी ठिकठिकाणचे मॉल्स, शॉप्समध्ये आकस्मिक भेट देऊन तेथील चेंजिंग रूम तपासण्यासाठी विशेष तपास पथक निर्माण करण्याची तयारी केली आहे. परिमंडळ-२ मधील कुठल्याही मॉल, शॉप, शोरूम किंवा दुकानांना भेट देतील आणि तेथील चेंजिंग रूमची तपासणी करतील. रूममध्ये छुपे कॅमेरे, मोबाईल तपासतील. सोबतच जो आरसा (मिरर) असतो तो पारदर्शी (दोन्हीकडच्या मंडळीला दिसणारा) आहे का, त्याचीही तपासणी करेल.
विकृतीला आळा घालण्यासाठी मंथन
यासंबंधाने उपायुक्त साहू यांच्याशी चर्चा केली असता त्या म्हणाल्या, या गंभीर प्रकाराची तेवढ्याच गंभीरपणे दखल घेण्यात आली आहे. यासंबंधाने पुढच्या काही तासात पोलीस अधिकाऱ्यांची आपण बैठक घेणार आहोत. त्यात या विकृतीला आळा घालण्यासाठी काय काय करायचे, त्याबाबत मंथन करण्यात येईल. त्यानंतर लवकरच सरप्राईज स्क्वॉडला सक्रिय केले जाईल, असे उपायुक्त साहू म्हणाल्या.