आश्चर्य ! नागपुरात अचानक विहिरीचे पाणी उष्ण झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 10:13 PM2019-10-19T22:13:38+5:302019-10-19T22:15:48+5:30
दोनच दिवसांपूर्वी कस्तूरचंद पार्कवर चार पुरातन तोफा आढळल्यानंतर शनिवारी भूगर्भातील आणखी एक आश्चर्यकारक घटना नागपुरात चर्चेचा विषय ठरली. येथील सुभाषनगर परिसरात एका अपार्टमेंटच्या विहिरीतील पाणी अचानक तापायला लागल्याने एकच खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोनच दिवसांपूर्वी कस्तूरचंद पार्कवर चार पुरातन तोफा आढळल्यानंतर शनिवारी भूगर्भातील आणखी एक आश्चर्यकारक घटना नागपुरात चर्चेचा विषय ठरली. येथील सुभाषनगर परिसरात एका अपार्टमेंटच्या विहिरीतील पाणी अचानक तापायला लागल्याने एकच खळबळ उडाली. बातमी वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी ही विहीर पाहण्यासाठी एकच गर्दी केली. यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा ताफा तसेच जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (जीएसआय) आणि राज्याची ग्राऊंड वॉटर सर्व्हे डेव्हलपमेंट एजेन्सी (जीएसडीए) ची टीमही घटनास्थळी पोहचली. टीमने या विहिरीच्या पाण्याची तपासणी केली असता पाण्याचे तापमान ६० अंश सेल्सियसवर गेले होते. आसपासच्या विहिरीतील पाण्याचे नमुनेही गोळा करण्यात आले. याशिवाय जीएसआय पुढे आठ दिवस या विहिरीवर लक्ष ठेवणार आहे.
सुभाषनगरच्या शास्त्री ले-आऊट भागातील विमल अपार्टमेंटमध्ये शनिवारी हा प्रकार समोर आला. अपार्टमेंटमधील रहिवासी धनंजय बावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी या विहिरीतून वाफा निघायला सुरुवात झाली होती. आधी धुके असल्याचे लोकांना वाटले. मात्र दिवस वाढतानाही वाफा थांबत नसल्याने संशय बळावला. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते, त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली. तोपर्यंत लोकांची गर्दी जमली होती. स्थानिक नगरसेवक प्रफुल गुडधे यांना माहिती देण्यात आली. लगेच अग्निशमन विभागाची त्रिमूर्तीनगर व नरेंद्रनगर स्टेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पाण्याची तपासणी केली. या प्रकाराची माहिती जीएसआयला देण्यात आल्यानंतर जीएसआय आणि जीएसडीएची टीमही घटनास्थळी पोहचली. पाण्याची तपासणी केली असता या पाण्याचे तापमान ६० अंश सेल्सियस असल्याचे आढळून आले. या पथकाने आसपासच्या सर्व विहीरी व बोअरवेलचे पाणी तपासले असता ते सामान्य आढळून आले. भूगर्भातील एखाद्या घडामोडीमुळे हा प्रकार झाल्याचा संशय जीएसआयचे संचालक विशाल साखरे यांनी व्यक्त केला. पाण्याचा पीएच स्तर आणि कन्डक्टीविटी सामान्य असल्याचे त्यांनी सांगितले. जीएसआयच्या टीमने या विहिरीसह सर्व नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठविले आहेत. दरम्यान पुढे पाण्यामध्ये होणारा बदल तपासण्यासाठी टीम आठ दिवस लक्ष ठेवणार असून त्यानंतरही पाण्याची तापमानवाढ थांबली नाही तर पुढचे उपाय करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकांनी विहिरीच्या पाण्याचा वापर करू नये आणि लहान मुले व प्राण्यांच्या सुरक्षेसाठी उपाय करण्याच्या सूचना रहिवाशांना दिल्या असल्याचे साखरे यांनी सांगितले.
१९ वर्षात नाही घडला प्रकार
२००१ साली बांधलेल्या या अपार्टमेंटमध्ये गाळेधारकांसाठी आठ मीटर विहीर खोदण्यात आली होती. आठ मीटर खोल असून साडे तीन मीटरवर पाणी आहे. धनंजय बावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत विहिरीच्या पाण्याचा वापर सुरू होता, मात्र गेल्या एक वर्षापासून या विहिरीच्या पाण्याचा उपयोग बंद झाला आहे. मात्र यापूर्वी कधी असा प्रकार घडला नाही. शनिवारी अचानक पाण्याचे तापमान वाढल्याने आश्चर्य आणि भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे आधी विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. विहिरीतील मोटर काढली असता, त्यातही काही बिघाड नसल्याचे दिसले. त्यामुळे संबंधित विभागाला माहिती देण्यात आल्याचे बावणे यांनी स्पष्ट केले.
कशाने गरम झाले असेल पाणी
जीएसआयचे संचालक विशाल साखरे व दोन वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञांच्या टीमने या विहिरीची तपासणी केली. विहिरीच्या पाण्याची उष्णता ६० अंश सेल्सियस आढळून आली. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विशाल साखरे यांनी सांगितले, भूगर्भातून उष्ण पाण्याचे झरे अनेक ठिकाणी येत असतात पण हा प्रकार विरळा आहे. कदाचित भूगर्भातील उष्ण भागात तडा गेल्याने त्यातून वर आलेल्या उष्णतेमुळे विहिरीचे पाणी गरम झाले असण्याची शक्यता आहे. मात्र त्यातून विषारी गॅसेस बाहेर येत नसल्याने सध्यातरी धोक्याचे कारण दिसून येत नाही. पाण्याच्या तापमानात आणखी वाढ झाल्यास उपाय करावे लागतील, अशी माहिती साखरे यांनी दिली. दरम्यान येथील पाण्यासह आसपासच्या विहिरी व १२० मीटर खोल बोअरवेलच्या पाण्याचे नमुने गोळा केले असून प्रयोगशाळेत त्यातील रासायनिक घटकांची तपासणी केल्यानंतर निश्चित कारण सांगता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढचे आठ दिवस व गरज पडल्यास महिनाभर या विहिरीकडे लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.