मेडिकलला सचिवांची ‘सरप्राईज व्हिजिट’
By admin | Published: December 25, 2014 12:25 AM2014-12-25T00:25:56+5:302014-12-25T00:25:56+5:30
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी बुधवारी मेडिकलला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी सफाईकामावर समाधान व्यक्त केले असले तरी सोनोग्राफीसाठी महिनाभर
सफाईवर समाधान : सोनोग्राफीच्या ‘वेटिंग’वर उपस्थित केले प्रश्न
नागपूर : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी बुधवारी मेडिकलला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी सफाईकामावर समाधान व्यक्त केले असले तरी सोनोग्राफीसाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्यावर नाराजी व्यक्त केली. सोनोग्राफीच्या आणखी दोन मशीन खरेदी करण्याचे निर्देश दिले. मेडिकलनंतर सचिवांनी दंत महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयालाही भेट दिली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का होईना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी मेडिकलची पाहणी केली. तीन तास चाललेल्या या पाहणीची सुरुवात त्यांनी अपघात विभागापासून केली. येथील साफसफाईवर त्यांनी समाधान व्यक्त करीत बाह्यरुग्ण विभागाला भेट दिली. येथील कार्यपद्धतीची माहिती घेतली असता त्यांनी ‘गुड वर्क’ असा शेरा दिला. येथून त्या औषध वितरण विभागात गेल्या. दोन्ही भागात असलेल्या औषध वितरणाच्या खिडक्यांवर आश्चर्य व्यक्त केले. आवश्यक बदल करण्याच्या सूचना केल्या.
बालरोग विभागाची केली स्तुती
म्हैसकर यांनी प्रसूती वॉर्डाची पाहणी करताना अचानक बालरोग विभागाचा वॉर्ड कुठे आहे, तो दाखवा, असे फर्मान सोडले. वॉर्ड क्र. ५ मध्ये आल्यावर त्यांनी तेथील व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले. विशेषत: स्वच्छतेला घेऊन विशेष काळजी घेण्यात आल्याने त्यांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांचे कौतुक केले.
‘फ्लोअर बेड’च्या जागी ‘फोल्डिंग बेड’
अस्थिरोग विभागाच्या वॉर्डात रुग्णांच्या तुलनेत खाटा कमी पडल्याने काही रुग्ण जमिनीवर उपचार घेत होते. म्हैसकर यांनी अचानक या वॉर्डाची पाहणी केली असता आश्चर्य व्यक्त केले. यावर उपाययोजना म्हणून ‘फ्लोअर बेड’च्या जागी ‘फोल्डिंग बेड’ लावण्याच्या सूचना दिल्या.
सोनोग्राफीच्या मशीन्स वाढवा
रेडिओलॉजी विभागात सोनोग्राफीसाठी वाढत्या प्रतीक्षा यादीला घेऊन म्हैसकर यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी विशेषत: गर्भवती महिलांना त्याच दिवशी अहवाल देण्याचे निर्देश दिले. यासाठी स्त्रीरोग विभागातच सोनोग्राफी मशीन लावता येईल का, यावर चर्चा करून येत्या काही महिन्यात दोन जास्तीच्या मशीन खरेदी करण्याचे निर्देश दिले.
दहा हिमोडायलिसीस मशीनची गरज
सुपर स्पेशालिटीच्या नेफ्रोलॉजी विभागात सात हिमोडायलिसीस मशीन आहेत. यातील तीन नादुरुस्त आहेत.
तीन खरेदीच्या प्रक्रियेत आहेत. यावर म्हैसकर यांनी रुग्णांची गर्दी विचारात घेऊन किमान दहा हिमो डायलिसीस मशीनची गरज आहे, असे लक्षात आणून दिले. यावेळी त्यांनी कॅथलॅबपासून इतरही विभागांची पाहणी केली.