शेतकरी अद्याप नक्षलवादी झाले नाहीत हे आश्चर्य
By admin | Published: June 7, 2017 01:49 AM2017-06-07T01:49:34+5:302017-06-07T01:49:34+5:30
सध्या राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. शेतकरी प्रचंड आक्रमक आहेत. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले,
अभय बंग : अमर हबीब, अभिमन्यू निसवाडे यांना जनमंचचा पुरस्कार प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. शेतकरी प्रचंड आक्रमक आहेत. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले, आत्महत्याही करून पाहिल्या. पण, बधीर झालेले सरकार साधी दखलही घ्यायला तयार नाही. अशाच सातत्याने होणाऱ्या उपेक्षेला कंटाळून गडचिरोलीतील आदिवासी नक्षलवादी झाले.
शेतकरीही तीच उपेक्षा भोगताहेत. परंतु ते अद्याप नक्षलवादी झाले नाहीत हे आश्चर्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले. जनमंच या सामाजिक संस्थेतर्फे जनमंच जनगौरव व जनमंच जनसेवक या दोन पुरस्कारांचे वितरण मंगळवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर होते. यावेळी मंचावर सत्कारमूर्ती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत अमर हबीब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्यासह जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील, जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, उपाध्यक्ष प्रमोद पांंडे व महासचिव नरेश क्षीरसागर उपस्थित होेते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते अमर हबीब यांना जनमंच जनगौरव पुरस्काराने तर डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना रेखाताई चोंढेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पहिल्या जनमंच जनसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराला उत्तर देताना डॉ. निसवाडे म्हणाले, मी सहसा पुरस्कार स्वीकारत नाही.
परंतु जनमंच ही प्रामाणिक आणि सामान्य माणसाच्या हितासाठी झटणारी संस्था आहे म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारला. मेडिकलला आशिया खंडातील अव्वल दर्जाचे रुग्णालय बनवायचे आहे. त्यासाठी माझी धडपड सुरू आहे. किडनी प्रत्यारोपण विभाग झाला, ट्रामा सेंटर झाले. आता आम्ही एम्सलाही मेडिकलमध्ये निमंत्रित केले आहे. या सर्व प्रयत्नात आम्हाला जनमंचसारख्या संस्थांच्या सहकार्याची गरज पडणार आहे.
न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी अध्यक्षीय भाषणातून दोन्ही सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव केला. अॅड. अनिल किलोर व प्रा. शरद पाटील यांनी आपल्या भाषणातून जनमंच करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी यांनी केले.
सामान्य नागरिकाच्या पुतळ्याने वेधले लक्ष
या कार्यक्रमानिमित्त मंचावर कुठल्याही देवदेवतांची प्रतिमा न ठेवता सामान्य नागरिकाचा प्रतिकात्मक पुतळा ठेवला होता. या पुतळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सामान्य नागरिकांच्या हितासाठी धडपडणाऱ्या जनमंचच्या कार्याचा प्रतीक ठरलेला हा पुतळा मूर्तिकलेचाही सुंदर नमुना ठरला.
शेतकरी नेते मांडवली करताहेत
सध्या शेतकरी संपाच्या नावावर शेतकऱ्यांच्या वेदनांचे भांडवल केले जात आहे. कथित शेतकरी नेते सरकारशी मांडवली करीत आहेत, असा थेट आरोप अमर हबीब यांनी केला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी आजची कृषी व्यवस्था व सरकारच्या पळपुटेपणावर टीका केली. ते पुढे म्हणाले, सरसकट कर्जमाफी हा खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे. कारण अनेक राजकारणी, व्यापारी आज शेतकरी बनून कर्ज घेत आहेत. सरकारला जर खरंच कर्जमाफी द्यायची असेल तर आधी त्यांनी आपल्या यंत्रणेमार्फत गरजू शेतकऱ्यांची यादी तयार करायला हवी, पण सरकार तसे करणार नाही; कारण त्यांना व्होट बँकेचे राजकारण करायचे आहे. हा पुरस्कार स्वीकारताना आपण तो का स्वीकारतोय, असा प्रश्न माझ्या मनाला बोचत आहे, कारण शेतकऱ्यांचे प्रश्न होते तसेच आहेत. सरकारला आम्ही वाकवू शकलो नाही, ही खंत आहे. या लढ्याला पुढे नेण्यासाठी आता महानगरातील किसनपुत्रांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अमर हबीब यांनी केले.