लकी खानवर फायरिंग करणाऱ्या आरोपींचे आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:52 PM2019-07-04T23:52:47+5:302019-07-04T23:53:44+5:30
शहरातील कुख्यात गुंड लकी खान ऊर्फ नदिम गुलाम नबी शेख (वय ३३) याच्यावर गोळ्या झाडणाऱ्या पाच आरोपींनी बुधवारी मध्यरात्री पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मात्र, त्यांना आम्ही या गुन्ह्यात अटक केली आहे, असा दावा करीत या सर्वांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे यांनी आज पत्रकारांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कुख्यात गुंड लकी खान ऊर्फ नदिम गुलाम नबी शेख (वय ३३) याच्यावर गोळ्या झाडणाऱ्या पाच आरोपींनी बुधवारी मध्यरात्री पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मात्र, त्यांना आम्ही या गुन्ह्यात अटक केली आहे, असा दावा करीत या सर्वांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे यांनी आज पत्रकारांना दिली.
कुख्यात गुंड लकी खान हा कोराडी मार्गावरील वेलकम सोसायटीत राहतो. त्याच्यावर हत्या, अपहरण, हत्येचा प्रयत्न, खंडणी वसुली, जमिनी बळकावणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. २ जुलैच्या रात्री ११.३० च्या सुमारास तो, त्याचा जावई आणि मित्र गिरीश थडानी कारमधून कोराडी मार्गाने जात होते. कल्पना टॉकीज चौकाजवळ आरोपी अकील अन्सारी खलील अन्सारी, धरम ऊर्फ धरमवीर ठाकूर, गुलाम अशरफी, सोहेल खान बब्बू खान, राजेश सदाशिव विजेकर,रितेश ऊर्फ बाल्या संजय झांझोटे आणि चार ते पाच साथीदारांनी डॅश मारून लकीची कार थांबवली. त्याच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. त्यात त्याच्या दंडाला गोळी लागून तो जखमी झाला होता. त्याने दिलेल्या बयानावरून मानकापूर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पोलीस आरोपींची शोधाशोध करीत असताना एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करीत आरोपींनी बुधवारी मध्यरात्री आत्मसमर्पण केले. उपरोक्त सर्वांना आम्ही अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला. यासंबंधाने गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त भरणे यांनी आज पत्रकार परिषदेत गुन्ह्याची, कुख्यात लकी खानची आणि आरोपींच्या गुन्हेगारी अहवालाची पत्रकारांना माहिती दिली.
लकी खान हा कुख्यात गुंड असून, त्याच्याविरुद्ध सदर, कोराडी, अंबाझरी आणि कोतवाली पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी कोतवालीतील एका हत्याकांडात त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी धरम ठाकूर याच्याविरुद्ध यशोधरानगर आणि जरीपटका ठाण्यात प्राणघातक हल्ला तसेच दंगा असे तीन गुन्हे दाखल आहेत.
नवाब ऊर्फ नब्बू छोटेसाब अशरफी याच्याविरुद्ध पाचपावली ठाण्यात हाणामारी आणि धमकी तसेच दंग्याचे ९ वर्षांपूर्वीचे ३ गुन्हे दाखल आहेत. राजेश विजयकर विरुद्ध यशोधरानगर आणि पाचपावलीत दंगा तसेच प्राणघातक हल्ल्याचे दोन गुन्हे तर गुलाम अशरफीविरुद्ध हाणामारी आणि धमकी दिल्याचे १० वर्षांपूर्वी पाचपावली, कोराडी आणि यशोधरानगर ठाण्यात तीन गुन्हे आहेत, असे यावेळी अतिरिक्त आयुक्त भरणे यांनी सांगितले.
गुन्ह्याच्या संंबंधाने उलटसुलट चर्चा
कुख्यात लकी खान याने पोलिसांना वारंवार विसंगत माहिती दिली आहे. पोलिसांच्या कारवाईतही अशीच विसंगती झाल्याचे दिसून येत असल्याने, पत्रकारांनी यासंबंधाने पत्रपरिषदेत अनेक प्रश्न उपस्थित केले. लकीने आधी आपल्यावर १० ते १२ जणांनी गोळ्या झाडल्याचे म्हटले होते. त्याकडे लक्ष वेधून १० ते १२ जणांनी गोळ्या झाडल्या तर लकीला एकच गोळी कशी लागली आणि तीही दंडाला कशी लागली, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता, त्याची आम्ही चौकशी करीत असल्याचे भरणे म्हणाले. सीटीटीव्ही फुटेज, आरोपींच्या कारवर किती गोळ्या लागल्या, त्याबाबतही विसंगती पुढे आली आहे. या प्रकरणात नब्बू नामक आरोपीचा प्रत्यक्ष संबंध नाही, असे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे सांगण्यात आले. तर, गुलाम अशरफी हा आरोपींचा मित्र आहे, तो या कटात सहभागी असावा, असा संशय असल्याने त्याला आरोपी बनविण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणाले. या गुन्ह्यांच्या संबंधाने शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. गँगस्टरच्या संपर्कातील एखादी पोलीस अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे
गँगस्टरच्या सांगण्यावरून निर्दोष तरुणाला गोवले
गँगस्टर लकी खान याने सूडबुद्धीने बयान देऊन गुलाम अशरफी नामक तरुणाला एका गंभीर गुन्ह्यात गोवण्याचा कट रचला आणि पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता एका कुख्यात गुन्हेगाराच्या बयानावर विश्वास केला. त्यामुळे एका निर्दोष तरुणाचे भविष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची कसून आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक असलम मुल्ला यांनी पत्रकार परिषदेतून केली.
२ जुलैच्या मध्यरात्री गँगस्टर लकी खानवर गोळीबार झाला. मुख्य आरोपी धरम ठाकूर याचे तीन लाख रुपये लकी खानवर होते. ते परत न करता अब्बास नामक गुंड साथीदाराच्या माध्यमातून लकीने धरम ठाकूर याचा गेम करण्याची तयारी केल्याची चर्चा दोन महिन्यांपासून होती. त्यासंबंधाने पोलिसांकडे तक्ररीही झाल्या होत्या. मित्रांमधील वाद टोकाला पोहचल्याचे पाहून गुलाम अशरफीने लकी, अब्बास, धरम आणि नब्बू तसेच त्यांच्या साथीदारांना एकत्र बसवून वाट मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यातून अब्बास आणि धरमचे मनोमिलन झाल्याने कुख्यात लकी एकटा पडला होता. हे सर्व गुलाम अशरफीने घडवून आणल्याने त्याच्यावर सूड उगविण्यासाठी गोळीबार प्रकरणात लकीने गुलामला आरोपी म्हणून अडकवण्याचा डाव टाकला.
विशेष म्हणजे, घटना घडल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुलामला सोबत घेऊन बुधवारी पहाटेपर्यंत धावपळ केली. बुधवारी सकाळी १० वाजता त्याला याच संबंधाने विचारपूस करायची आहे म्हणून गुन्हे शाखेत बोलवून घेतले. त्याला सकाळी १० वाजतापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बसवले आणि मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांची ही कारवाई कुख्यात गुन्हेगारांचे मनोबल उचावणारी आहे. अशाने कोणताही गुन्हेगार यापुढे कुणाचेही नाव सूडबुद्धीने आपल्या तक्रारअर्जात देईल आणि कोणत्याही निर्दोष व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होईल, अशी भीती निर्माण झाल्याचे पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक असलम मुल्ला म्हणाले. गुरुद्वारा प्रधान समितीचे सरपंच गुरुविंदरसिंग ढिल्लन, शितला माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पवन ऊर्फ सोनू अरोरा, सलगौसिया मशीद कमिटीचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही हीच भीती पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषी असेल तर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही उपरोक्त मंडळींनी केली.
मुख्यमंत्र्यांसह अनेकांकडे तक्रार
या प्रकाराची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पोलीस महासंचालक तसेच पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत उपरोक्त मंडळींनी सांगितले.