आर्थिक कोंडी टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून सुट्यांचे समर्पण
By नरेश डोंगरे | Published: May 14, 2023 08:47 PM2023-05-14T20:47:11+5:302023-05-14T20:47:20+5:30
५० टक्के रजा विकण्याची मुभा : रजेच्या मोबदल्यात मिळतो आर्थिक लाभ
नागपूर : सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना भरपूर सवलती आणि सुट्या (रजा) मिळतात. कामाचाही फारसा बोझा नसतो. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अलीकडच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत मोठी चढाओढ असायची. त्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना सुट्या मिळत असल्या तरी सवलती कमी मिळतात. त्यांचा पगारही कमी असल्याची ओरड नेहमी कानावर पडते. आधी कोरोना आणि नंतर संपाच्या फटक्यामुळे एसटीचे बरेचसे कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडले होते. त्याचमुळे की काय, ते त्यांना मिळणाऱ्या एकूण रजेपैकी जवळपास ५० टक्के रजा विकून त्या मोबदल्यात आर्थिक लाभ पदरात पाडून घेत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळते. एसटीच्या कर्मचाऱ्यांचा आर्थिक ताळेबंद अन् अर्थाजनांचे स्त्रोत याचा सहज कानोसा घेतला असता ही बाब समोर आली. एसटीच्या नागपूर विभागात साधारणत: अडीच हजारांवर कर्मचारी आहेत. त्यात १०५० चालक, ६५० वाहक आणि जवळपास ८०० प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना मिळणाऱ्या एकूण रजेपैकी ५० टक्के रजा विकण्याची मुभा आहे.
एसटीचालक, वाहकांना वर्षाला ४० रजा
एसटीच्या चालक आणि वाहकांना वर्षभरात प्रत्येकी ४० अर्जित रजा मिळतात आणि दहा सणावारांच्या सुट्या असतात. प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मात्र वर्षाला प्रत्येकी ३० रजा मिळतात.
किती रजांचे पैसे मिळतात?
कर्मचारी त्यांच्या एकूण रजांपैकी प्रशासकीय नियमांचं पालन करून वर्षाला ४० पैकी २० रजा विकू शकतात. दुसऱ्या एका नियमानुसार कर्मचारी १५ दिवस सुट्या घेऊन ३० रजा विकू शकतात, असेही अधिकारी सांगतात. त्यांना जेवढ्या रजा विकल्या त्याचे त्यांच्या पगाराच्या हिशेबाप्रमाणे पैसे मिळतात.
पैशाचा हिशेब वेगवेगळा
सर्वजणांनी सारख्या रजा विकल्या म्हणजे सर्वांना सारखीच रक्कम (परतावा) मिळेल, असे नाही. कुणाचा पगार ३० हजार असेल तर कुणाचा ४० हजार असेल. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला एका दिवसाला किती रक्कम येईल, या हिशेबाने तितक्या दिवसाच्या रजेचे पैसे परत मिळेल.
'तो' कर्मचाऱ्यांचा अधिकार
प्रशासकीय नियमांचे पालन करून कर्मचारी त्यांच्या मर्जीप्रमाणे रजा विकू शकतात किंवा सरेंडर करू शकतात. त्यासाठी कर्मचाऱ्यावर कुठलाही दबाव अथवा दडपण नसते. तो त्यांचा हक्क आणि अधिकार आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याची मुभा असल्याचे या विषयाच्या संबंधाने बोलताना एसटीचे अधिकारी म्हणतात.
प्रत्येकाला ज्याप्रमाणे पैशाची गरज असते त्याचप्रमाणे रजेचीही गरज असते. रजा घेण्यासाठी प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असते. आवश्यक नसेल तर कुणी विनाकारण रजा घेत नाही. त्यापेक्षा त्या रजेच्या मोबदल्यात रक्कम मिळते आणि तिचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी, कुटुंबातील महत्त्वाच्या कामासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे रजा विकताना प्रत्येकाचे वेगवेगळे गणित असते. - अजय हट्टेवार, प्रांतीय उपाध्यक्ष, एसटी कामगार संघटना