आत्मसमर्पण केलेल्या आरोपीने काढून दिली वाघाची दोन किलो हाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 06:59 PM2021-08-30T18:59:04+5:302021-08-30T18:59:58+5:30
Nagpur News वाघ शिकार प्रकरणातील आरोपी राहुल भलावी (बनेरा) याने रविवारी आत्मसमर्पण केले. तसेच वाघाची दोन किलो हाडेही काढून दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खवासा येथे वनविभागाने केलेल्या वाघ शिकार प्रकरणातील आरोपींचे कारनामे फक्त महाराष्ट्रातील जंगलातच नाहीत तर मध्य प्रदेशातील जंगलातही असल्याचा संशय तपास यंत्रणेला आला आहे. दरम्यान, या प्रकरणात गुंतलेल्या आरोपीने रविवारी आत्मसमर्पण केल्यावर पुन्हा वाघाची दोन किलो हाडे काढून दिली. यावरून पोलीस आणि वन विभागाला त्यांच्या आंतरराज्यीय कारवायांचा अंदाज आला आहे. (The surrendered accused submitted two kilo bones of tigers )
२४ ऑगस्टला खवासा येथील वाघ शिकार प्रकरणातील ही कारवाई आहे. २६ ऑगस्टला पारशिवनी तालुक्यातील कैलास भलावी (बनेरा) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून वाघ शिकार प्रकरणातील हाडे जप्त करण्यात आली होती. यातीलच आरोपी राहुल भलावी (बनेरा) याच्याही मागावर पेंच व्याघ्र प्रकल्पाची चमू होती. पथकाला हुलकावणी देत बरीच ठिकाणे बदलल्यावर अखेर त्याने रविवारी आत्मसमर्पण केले. वाघाची दोन किलो हाडेही काढून दिली. ही हाडे देवलापर वन परिक्षेत्रातील पिंडकेपार भागातील वाघाच्या शिकारीतील असल्याचा वन विभागाला संशय आहे. प्रयोगशाळेतील तपासणीनंतर हे कळणार आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशातही गुन्हा दाखल असल्याने या दोघांनाही तेथील वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या दोघांसोबत अनेक जण यात गुंतले असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी दोन्ही राज्यातील यंत्रणा एकमेकांशी संपर्क राखून आहे.
चार दिवसापूर्वी दोन कारवाया
दरम्यान, २४ ऑगस्टला पिंडकेपार येथील रोशन उईके आणि नर्बद पुन्नू कोडवते या दोघांना भरमार बंदूक आणि हरीण, रानडुक्कर या वन्यप्राण्यांची हाडे आणि शिंगांसह अटक केली होती. रामटेक वन उपविभागाच्या या कारवाईनंतर मध्य प्रदेश वनविभागाकडे या आरोपींना सोपविले होते. या कारवाईनंतर २७ ऑगस्टला वाघाच्या दातासह चार जणांना नागपूर वन विभागाच्या बुटीबोरी वनपरिक्षेत्राकडून अटक करण्यात आली होती. या सर्व घटनांमधील आरोपींचा एकमेकांशी असलेला संंबंध तपासला जात आहे.
...