सरोगसी मदर्सना पैशाऐवजी धमक्या; उपराजधानीतील वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:20 AM2018-07-28T10:20:48+5:302018-07-28T10:24:06+5:30
पैशाचे आमिष दाखवून गरीब महिलांना सरोगसी मदर बनविणारे आणि प्रसूती झाल्यानंतर त्यांच्याकडून मूल ताब्यात घेऊन पैसे देण्याऐवजी त्यांना धमक्या देणारे रॅकेट उपराजधानीत सक्रिय आहे.
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पैशाचे आमिष दाखवून गरीब महिलांना सरोगसी मदर बनविणारे आणि प्रसूती झाल्यानंतर त्यांच्याकडून मूल ताब्यात घेऊन पैसे देण्याऐवजी त्यांना धमक्या देणारे रॅकेट उपराजधानीत सक्रिय आहे. शारीरिक आणि मानसिक यातना सहन करणाऱ्या गरजू महिलांची कोंडी करणाऱ्या या रॅकेटचे काळे कारनामे पीडित महिलांकडून तक्रारीच्या रूपाने लोकमतच्या हाती लागले आहे.
हाती आलेल्या या रॅकेटमध्ये अनेक जण गुंतले असले तरी त्यात प्रथमदर्शनी पाच जणांची नावे पुढे आली आहे. त्यात दोन महिला डॉक्टरांचाही समावेश आहे.
खास सूत्रांकडून लोकमतला मिळालेल्या खळबळजनक माहितीनुसार, आर्थिक संपन्न असलेल्या ज्या दाम्पत्यांना मुलबाळ होत नाही, अशा दाम्पत्याचे संबंधित रुग्णालयातून नाव, पत्ता मिळवून रॅकेटमधील दलाल त्यांच्याशी संपर्क करतात. संपर्कातील तुम्हाला सरोगसी मदरच्या माध्यमातून संतानसुख मिळू शकते, अशी आशा संबंधित दाम्पत्याला हे दलाल दाखवतात. दाम्पत्यापैकी मातृत्व सुखाला आसुसलेल्या महिलेशी ते वारंवार संपर्क करतात. ‘तुम्ही फक्त हो म्हणा, आम्हीच सर्व व्यवस्था करतो, भाड्याने गर्भपिशवी देणारी महिला (सरोगसी मदर) देखील आम्हीच मिळवून देतो’, असेही आमिष हे दलाल संबंधितांना दाखवतात. मातृत्व-पितृत्वाचे सुख भोगण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेल्या दाम्पत्याकडून तगडी रक्कम मोजण्याची तयारी दाखवली जाताच रॅकेटमधील दलाल योजनाबद्ध पद्धतीने त्यांच्याकडून अॅडव्हान्स घेतात. त्यानंतर सुरू होतो या गोरखधंद्याचा दुसरा अंक.
झोपडपट्टीत राहणाऱ्या, पतीपासून विभक्त असलेल्या, आर्थिक कोंडीत असणाऱ्या किंवा विधवा महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना सरोगसी मदर होण्यास रॅकेटमधील दलाल तयार करवून घेतात. त्यावेळी तिला गर्भधारणेपासून तो प्रसूती आणि त्यानंतरही काही महिने औषधोपचार आणि चांगल्या देखभालीची हमी दिली जाते.मुलांचे शिक्षण, कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी वणवण फिरणाऱ्या किंंवा प्रचंड आर्थिक कोंडी अनुभवणाऱ्या महिला या रॅकेटच्या जाळ्यात अडकतात. त्या सरोगसी मदर होण्यास तयार होतात. ठरलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम आधी आणि उर्वरित रक्कम प्रसूतीनंतर देण्याचे ठरते. अशाच प्रकारे ३३ वर्षीय रंजना नामक महिलेला रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका वठविणारे मनीष आणि त्याची पत्नी विधी या दोघांनी तयार करवून घेतले. तुला अडीच लाख रुपये मिळतील, असे त्यावेळी मनीष आणि विधीने रंजनाला सांगितले होते. पतीपासून विभक्त असलेल्या दोन मुलांची आई रंजना हिने मुलांच्या शिक्षणाचा आणि भविष्याचा विचार करून सरोगसी मदर होण्याची तयारी दाखवली. ठरल्याप्रमाणे २५ जानेवारी २०१७ पासून रंजनावर रॅकेटने त्यांच्याशी संबंधित डॉक्टरकडे सरोगसी मदरचे उपचार सुरू केले. २६ सप्टेंबरला रंजनाची छत्रपती चौक आणि रविनगर चौकातील महिला डॉक्टरने प्रसूती केली. या कालावधीत तिला थोडे थोेडे करीत एक लाख रुपये देण्यात आले.
डीसीपी भरणेंनी घेतली तात्काळ दखल
न्याय मिळविण्यासाठी पायपीट करणाऱ्या पीडित रंजनाची व्यथा पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या कानावर जाताच त्यांनी तिची गंभीर दखल घेतली. त्यांनी तात्काळ पीडित रंजनाकडून या प्रकरणाची माहिती घेतली. तिला आरोपींबाबत फारशी माहिती नसूनही त्रोटक माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून चौकशीचे चक्र फिरवले. शुक्रवारी रात्री लॉ आॅफिसर आणि संबंधितांना एकत्रित बोलवून या प्रकरणाची चर्चा करण्यात आली. या संबंधाने उपायुक्त भरणे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता प्रकरणाची कसून चौकशी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. उशिरा रात्रीपर्यंत या प्रकरणात नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे संकेतही त्यांनी दिले.
काम संपताच जीवाशी खेळ
बाळंतपण झाल्यानंतर तिच्याकडून नवजात शिशू घेऊन चार दिवसातच तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी रंजनाची प्रकृती अत्यंत खराब होती. शारीरिक यातना सहन करीत तिने कोणतीही कुरबूर न करता उर्वरित रक्कम मागितली तेव्हा तिला संबंधित दोन महिला डॉक्टर, जिचे बाळ तिने आपल्या गर्भात वाढवले ती महिला अशा तिघांनी तिला दीड लाख रुपये मनीष आणि विधीकडून घेण्यास सांगितले. रंजनाने मनीष आणि विधीकडे रक्कम मागितली असता त्यांनी तिला टाळणे सुरू केले. शारीरिक स्थिती चांगली नसतानादेखील रंजना जीवाची पर्वा न करता आपली रक्कम मिळावी म्हणून संबंधितांकडे पायपीट करू लागली. आरोपी मनीष आणि विधी मात्र तिला धमकी देऊ लागले. अलीकडे कळस झाला. पुन्हा पैसे मागितले तर जीवे ठार मारेन, असे म्हणत मनीषने तिला अश्लील शिवीगाळ चालवली आहे.