पहिल्यांदाच सरोगेट मदर प्रकरणास मंजूरी; जिल्हा वैद्यकिय मंडळाचा निर्णय
By सुमेध वाघमार | Published: February 29, 2024 09:14 PM2024-02-29T21:14:13+5:302024-02-29T21:14:41+5:30
सरोगसी कायदाची अंमलबजावणी
सुमेध वाघमारे, नागपूर : सरोगसी कायदा २०२१ अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वैद्यकिय मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाने पहिल्यांदाच गुरुवारी सरोगेट मदर प्रकरणास मंजूरी दिली आहे. यामुळे जे पती-पत्नी मुलाला जन्म देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा आशेचे किरण ठरण्याची शक्यता आहे.
जिल्हा वैद्यकिय मंडळात अध्यक्षस्थानी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. राठोड असून सदस्यांमध्ये स्त्रीरोग तज्ञ व डागाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर, वरीष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. माधुरी थोरात, वरीष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मडावी व डॉ. जयश्री वैद्य आदींचा समावेश आहे. या मंडळाकडे आलेल्या अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी सरोगेट आई या स्वत: कोणाचेही दबावाला किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता इच्छेनुसार सरोगसी प्रक्रियेला सामोरे जात असल्याची खात्री प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात आली. तसेच सरोगेट आई व सरोगसी इच्छुक कुटुंबीयाची शारीरिक व मानसिक वैद्यकिय अहवालाच्या आधारावर मंडळाने सवार्नुमते निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. या बैठकीस मंडळातील सदस्यांसह वैद्यकीय अधिकारी डॉ. रिना लांजेवार व अॅड. आनंद भिसे व सरोगसी इच्छुक कुटुंबीय, सरोगेट आई मंडळासमोर उपस्थित होते.
-सरोगसी म्हणजे काय?
सरोगसी म्हणजे एक स्त्री आणि दुसरे जोडपे किंवा एकल पालक (सिंगल पॅरेन्ट) यांच्यातील करार होय. जेव्हा पती-पत्नी मुलाला जन्म देऊ शकत नाहीत तेव्हा दुसºया स्त्रिच्या पोटातून मुलाला जन्म देण्यास सरोगसी म्हणतात. ज्या स्त्रिच्या गर्भाला मूल जन्माला घालण्यासाठी भाड्याने घेतले जाते, तिला सरोगेट मदर असे म्हणतात.
-सरोगसीचे दोन प्रकार
- पारंपारिक सरोगसी : वडिलांच्या शुक्राणूंना दुसºया स्त्रिच्या स्त्रिबिजांसह फलित केले जाते.
- गर्भधारणा सरोगसी : या प्रकारामध्ये आई-वडिल या दोघांचे स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचे मिश्रण टेस्ट ट्यूब पद्धतीने करुन हा गर्भ सरोगेट मातेच्या गर्भाशयात रोपण केला जातो.
- कोणत्या परिस्थितीमध्ये ‘सरोगसी’चा पर्याय उपलब्ध होतो
- जर गर्भपात पुन्हा पुन्हा होत असल्यास
- गर्भाशय कमकुवत असेल किंवा आणखी काही समस्या असतील
- गर्भाशयाची निर्मिती जन्मत:च झालेली नसेल
- तीनवेळापेक्षा अधिक वेळा उपचार अयशस्वी झाले असतील
- गर्भाशयाला टीबीचा आजार असेल
- कोणतीही अशी समस्या ज्यामुळे गर्भधारणा करणे अशक्य असेल किंवा धोकादायक असेल.
सरोगेट माता कोण बनते ?
- सरोगेट मातेचे वय २५ ते ३५ असावे
- सरोगसी महिलेचे वय हे २३ ते ५० आणि पुरुषाचे वय २६ ते ५५ दरम्यान असावे.
- सरोगेट माता विवाहित असावी व तिला स्वत:चे एक मूल देखील असावे.
- कोणतीही महिला फक्त एकदाच सरोगेट माता होऊ शकते.
- हे काम कमाईचे साधन न मानता, समोरच्याला मदत करण्याच्या हेतू असावा