सामाजिक समरसतेबाबत संघाचे देशपातळीवर सर्वेक्षण

By admin | Published: October 17, 2016 02:40 AM2016-10-17T02:40:49+5:302016-10-17T02:40:49+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील काही विशिष्ट वर्गांसोबतच जुळला असल्याचा समाजात सर्वसाधारण समज आहे.

Survey of the country on social harmony | सामाजिक समरसतेबाबत संघाचे देशपातळीवर सर्वेक्षण

सामाजिक समरसतेबाबत संघाचे देशपातळीवर सर्वेक्षण

Next

मंदिर, पाणवठे, स्मशानभूमीवरील भेदभाव शोधणार : सर्वेक्षणाच्या आधारावर उपाययोजना करणार
योगेश पांडे  नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील काही विशिष्ट वर्गांसोबतच जुळला असल्याचा समाजात सर्वसाधारण समज आहे. ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागील काही काळापासून सामाजिक समरसतेबाबत सक्रिय पुढाकार घेतला आहे. देशात सामाजिक समतेबाबत प्रत्यक्ष स्थिती काय आहे, याबाबत संघातर्फे विविध प्रातांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणाच्या अहवालाच्या आधारावर गावागावांमधील मंदिरे, पाणवठे व स्मशानभूमीवरील भेदभाव मिटविण्यासाठी संघ स्वयंसेवकांकडून उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देश तंत्रज्ञानाच्या पातळीवर प्रगती करत असला तरी प्रत्येक गावात जातीगत भेदभाव दिसून येतो हे कटू सत्य आहे. यासंदर्भात मार्च २०१५ मध्ये नागपुरात झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सामाजिक समरसतेचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यानंतर संघातर्फे विविध पातळ्यांवर काम सुरू झाले. सरसंघचालकांनीदेखील समाजात भेदभाव असून त्याला दूर करण्याची आवश्यकता असल्याचे वेळोवेळी प्रतिपादन केले. दरम्यानच्या काळात गोमांसबंदी, गोरक्षा इत्यादी मुद्यांमुळे संघ व संघप्रणित संघटनांवर जोरदार टीका झाली.
दरम्यान, अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्याअगोदर देशातील खरी स्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे संघ पदाधिकाऱ्यांचे मत होते. देशभरात संघाचे ४२ प्रांत आहेत. यातील बहुतांश प्रातांमध्ये गावागावांमधील भेदभाव जाणून घेण्यासंदर्भात सर्वेक्षण सुरू झाले. यात प्रामुख्याने गावांतील मंदिरे, पाणवठे व स्मशानभूमी येथे जाती पंथांच्या आधारावर भेदभाव आहे का, सामाजिक समरसतेचे प्रमाण किती आहे इत्यादी मुद्यांच्या आधारावर सर्वेक्षण सुरू आहे. काही प्रातांमधील सर्वेक्षणाचे अहवाल संघ मुख्यालयाला सादरदेखील झाले असून त्यातील आकडे धक्कादायक आहेत.

गाव-मोहल्ला पातळीवर संघाचा भर
याबाबत संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे. नंदकुमार यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता, त्यांनी असे सर्वेक्षण सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सामाजिक समरसता केवळ भाषणांमधून येणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. सत्यस्थिती जाणून घेतल्याशिवाय प्रभावी कृती करणे उपयोगाचे ठरणार नाही. त्यामुळे विविध प्रातांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे तर काही ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. समाजात एकता राहावी, भेदभाव नष्ट व्हावा ही संघाची भूमिका आहे. सर्वेक्षणाच्या आधारावर प्रांतस्तरांवर स्वयंसेवकच आपापल्या परीने सामाजिक समरसता दृढ करण्यासाठी उपाययोजना करतील, असे जे. नंदकुमार यांनी स्पष्ट केले. गाव-मोहल्ला पातळीवरून भेदभाव नष्ट करण्यासाठी सुरुवात झाली तर आपोआपच सामाजिक समरसता वाढत जाईल. त्यामुळे स्वयंसेवकांचा भर याकडेच आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.

Web Title: Survey of the country on social harmony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.