पारडी, भरतवाडा, पुनापूरचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण
By admin | Published: April 17, 2017 02:46 AM2017-04-17T02:46:20+5:302017-04-17T02:46:20+5:30
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या क्षेत्राधिष्ठित विकासासाठी निवड करण्यात आलेल्या पारडी, भरतवाडा, पुनापूरच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्प : नियोजनबद्ध विकास होणार
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या क्षेत्राधिष्ठित विकासासाठी निवड करण्यात आलेल्या पारडी, भरतवाडा, पुनापूरच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण यूएव्ही ड्रोनद्वारे करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या आधारावर संबंधित परिसराच्या विकासाचा आराखडा तयार केला जाईल.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत क्षेत्राधिष्ठित विकासाकरिता पारडी-भरतवाडा-पुनापूर या भागाची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या भागामध्ये विकास आराखड्यातील तरतुदीनुसार विकास करण्यासाठी निर्बंध असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झालीत. यामुळे या भागाचा नियोजनबद्ध विकास होऊ शकला नाही. पारडी-भरतवाडा-पुनापूरप्रमाणे नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ना-विकास क्षेत्रात (हरितपट्ट्यात) अनधिकृत अभिन्यास (ले-आऊट) तयार करून जमीनमालकांनी जमिनीची विल्हेवाट लावली. अधिकृत इमारतींमध्ये ज्या व्यक्तींना घर घेणे परवडत नाही अशा व्यक्तींनी ५०० ते १००० चौरस फुटांचे छोटे प्लॉट विकत घेऊन त्यावर महानगरपालिका अथवा नासुप्रची कोणती परवानगी न घेता बांधकामे केली आहेत. गुंठेवारी
अधिनियमनान्वये यापैकी काही बांधकामे नियमितदेखील झालीत. तथापि, अशा भागांमध्येदेखील रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, शाळा, दवाखाने, क्रीडांगण व मनोरंजनाची साधने उपलब्ध झालेली नाहीत. नियोजनातील या त्रुटी लक्षात घेऊन शहराच्या विविध अविकसित भागांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठी रिट्रो फिटिंग तत्त्वावर नगर रचना परियोजना राबविण्याचा निर्णय स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत महापालिकेने घेतला. त्यानुसार क्षेत्राधिष्ठित विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक पारडी, भरतवाडा व पुनापूर या अतिमागास भागांची निवड करण्यात आली. आता त्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून नगर रचना परियोजना तयार करण्याचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, नगरसेवक मनीषा अतकरे, वैशाली वैद्य, जयश्री रारोकर, राजकुमार शेलोकर, सहायक आयुक्त सुभाष जयदेव, बबलफ्लाय टेक्नॉलॉजीस प्रा.लि.चे टेक्नो कमर्शियल मॅनेजर अमरदीप सिंग उपस्थित होते.
याअंतर्गत मे. बबलफ्लाय टेक्नॉलॉजीस प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून यूएव्ही ड्रोनने सर्वेक्षण सुरू करण्यात आले. यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली. पुढील १० दिवसांत सुमारे ९५१ एकर क्षेत्रातील इमारती व मोकळ्या जागांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येईल.
एचसीपी अहमदाबाद या कंपनीमार्फत नगर रचना परियोजना तयार करण्यात येणार आहे. ड्रोन सर्वेक्षणामुळे प्रकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेला गती प्राप्त होणार असून, ही प्रक्रिया अधिकाधिक अचूक होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)