सर्वेक्षणाचा पॅटर्न राज्यभर राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:39 AM2017-09-04T01:39:35+5:302017-09-04T01:44:01+5:30

स्वातंत्र्यापूर्वीचे पोलीस नागरिकांनी ब्रिटिशांपुढे नतमस्तक व्हावे म्हणून काम करीत होते. आता आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी आहोत, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आहोत,.....

 The survey will be implemented throughout the state | सर्वेक्षणाचा पॅटर्न राज्यभर राबविणार

सर्वेक्षणाचा पॅटर्न राज्यभर राबविणार

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नागपूर पोलिसांच्या प्रगतीचे कौतुक, उत्कृष्ट पोलीस अधिकारी-कर्मचाºयांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यापूर्वीचे पोलीस नागरिकांनी ब्रिटिशांपुढे नतमस्तक व्हावे म्हणून काम करीत होते. आता आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी आहोत, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आहोत, ही भावना ठेवून पोलिसांनी काम केले पाहिजे. पोलिसांची कार्यशैली, त्यांचे वर्तन आणि नागरिकांच्या पोलिसांकडून अपेक्षा या संबंधाने केलेल्या सर्वेक्षणात नागपूर पोलिसांनी लक्षणीय प्रगती केल्याचा निष्कर्ष समोर आला. ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र, त्यामुळे पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. यापुढे अधिक चांगली कामगिरी पोलिसांना करावी लागणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले. पोलिसांच्या कामकाजाचे जनतेकडून मूल्यांकन करून घेण्याचा राज्यातील हा पहिला प्रयोग अनुकरणीय वाटत असल्यामुळे नागपूरच्या धर्तीवर राज्यातील इतर प्रमुख शहरातही जनतेच्या पोलिसांबाबत अपेक्षा व आकलनासंदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

जनतेला पोलिसांच्या कार्यशैलीबाबत काय वाटते, त्यांची जनमानसातील प्रतिमा कशी आहे, पोलिसांकडून सर्वसामान्य जनतेच्या काय अपेक्षा आहेत, ते जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी येथील तिरपुडे इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट एज्युकेशन संस्थेतर्फे एक सर्वेक्षण करून घेतले. सर्वेक्षणातील निष्कर्षाचे सादरीकरण येथील पसर््िास्टंट कंपनीच्या कालिदास आॅडिटोरियम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी खासदार अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, प्रकाश गजभिये, अनिल सोले, समीर मेघे, परिणय फुके, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु सिध्दार्थ विनायक काणे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाबद्दलच्या अपेक्षा आणि आकलनाचे सर्वेक्षण करताना सन २०१४ आणि २०१७ मधील तुलनात्मक निष्कर्ष समोर आले आहेत. गुणात्मक बदलाबद्दल सकारात्मक निष्कर्ष पुढे आल्यामुळे पोलीस आयुक्तांचे आणि त्यांच्या चमूचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि गृहखातेही माझ्याकडेच असल्यामुळे नागपुरात कोणती घटना घडली की लगेच राष्टÑीय बातमी बनविली जाते. त्यामुळे येथील गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे पोलिसांमोर आव्हान होते. ते आव्हान पेलण्यात शहर पोलीस यशस्वी झाले. गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यात, येथील भूमाफियांना त्यांची जागा दाखवण्यात, मोठ्या गुन्ह्यांचा तपास करण्यात आणि दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यात शहर पोलिसांनी यश मिळवले आहे. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये पोलिसांबद्दल असलेला विश्वास वाढला आहे. सकारात्मक बदलामुळे पोलिसांच्या कामकाजाची पुढील दिशाही ठरणार आहे. तिरपुडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आधुनिक व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण सर्वेक्षणाचे कार्य केल्यामुळेच पोलिसांची जनमानसातील प्रतिमा, वागणूक, संपर्क क्षमता याबद्दलचा स्पष्ट निष्कर्ष साधार काढण्यात आला. या निष्कर्षामुळेच जनता आणि पोलिसांमधील सहकार्याची भावना वाढीस लागणार आहे.
नागपूर पोलिसांनी महिला-मुलींच्या संरक्षणासाठी भरोसा सेल, बडी कॉपची निर्मिती, भूखंड माफियांच्या विरोधात विशेष पथक, वाहतूक सुधारण्यासाठी एन ट्रॅक्स, तसेच एन कॉप्स एक्सलन्सच्या माध्यमातून कार्यक्षमता सिध्द केली आहे. हे करतानाच स्वत:च्या कामकाजाचे मूल्यांकन एका शैक्षणिक संस्थेकडून करवून घेत नागरिकांच्या अपेक्षांवर पोलीस खरे उतरल्याबद्दल त्यांचे जेवढे कौतुक करावे, ते कमीच असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासोबतच शहरात सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्याचेही काम सुरू आहे. मुंबईत पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात सीसीटीव्ही नेटवर्कचा खूप फायदा झाला. कोणत्या ठिकाणी काय स्थिती आहे आणि तेथे काय मदत केली पाहिजे, ते पोलिसांना नियंत्रण कक्षात बसून कळत होते.
नागपूरसह राज्यातील अनेक शहरात सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. पोलिसांना त्यांच्या मालकी हक्काची घरे मिळवून देण्यास शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीदेखिल यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
पासपोर्टचा कालावधी २४ तासाचा
पासपोर्टसाठी संबंधित व्यक्तीच्या पडताळणीची प्रक्रिया मुंबई पोलीस २४ तासात पार पाडतात. त्यामुळे मुंबईच्या तुलनेत नागपूर पोलिसांनी मागे का असावे, असा प्रश्नही त्यांनी मिश्किलपणे उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सीसीटीएनएसला बॉयोमेट्रिक व आधार क्रमांकाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्यामुळे कोणत्याही व्यक्तीची माहिती झटपट पुढे येईल, कुणी लपवाछपवी करू शकणार नाही, हा प्रकार कानून के हात अब बहोत लंबे हो गये है, हे दर्शविणारा आहे, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांचा फ्रेश मूड
कार्यक्रमाचे खुसखुशीत संचालन करताना पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी ‘मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सखोल मार्गदर्शन करावे, असे म्हणत त्यांना भाषणाला निमंत्रित केले. हसतमुख मूडमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवातच मिश्किलपणे केली. माकणीकर यांनी असे काही खोलवर संचालन चालविले आहे की मला आता सखोल मार्गदर्शन करण्याची गरजच उरली नाही, असे म्हणत त्यांनी सभागृहात हंशा पिकविला.
‘ड्रग फ्री सिटी’चा पोलीस आयुक्तांचा संकल्प
तत्पूर्वी, पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी आपल्या भाषणातून शहर पोलिसांच्या कामगिरीचा धावता आढावा घेतला. आतापर्यंत गुणवत्तापूर्वक सेवेला प्राधान्य देत आम्ही लोकोपयोगी उपक्रम राबविले. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आमचे प्रोत्साहन वाढले आहे, असे सांगून डॉ. व्यंकटेशम यांनी आता शहराला भिकारीमुक्त तसेच ड्रग फ्री सिटी बनवायचे आहे, असा संकल्प जाहीर केला. गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी प्रास्ताविकातून नागपूर पोलिसांचे उपक्रम सांगितले. सर्वेक्षण प्रकल्प प्रमुख डॉ. ललित खुल्लर यांनी पोलिसांच्या रिपोर्ट कार्डचे सादरीकरण केले. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी संचालन तर, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी आभार मानले. सुधारणा घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका वठविलेल्या कोराडी, पाचपावली, धंतोली, प्रतापनगर, नंदनवन, अजनी, जुनी कामठी तसेच वाहतूक पोलिसांमधील विशेष कामगिरीसाठी एमआयडीसी पोलीस, भरोसा सेल, एन कॉप्स, बडी कॉप्स आणि महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी ज्यांनी महत्त्वाची भूमिका वठविली त्या सर्व अधिकारी कर्मचाºयांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
 

Web Title:  The survey will be implemented throughout the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.