उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात सूर्या वाघाचे ‘जंगलराज’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:02 AM2021-03-22T11:02:50+5:302021-03-22T11:03:22+5:30
Nagpur News उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या जंगलात सध्या सूर्या (टी-९) या वाघाचे ‘जंगलराज’ सुरू झाले आहे. या जंगलावर सध्यातरी त्याचीच हुकमत दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या जंगलात सध्या सूर्या (टी-९) या वाघाचे ‘जंगलराज’ सुरू झाले आहे. या जंगलावर सध्यातरी त्याचीच हुकमत दिसत आहे. तो या जंगलात येताच, टी-७ आणि टी-६ या दोन वाघांनी आपला अधिवास बदलला. त्यानंतर, आता तो जंगलातील वाघिणींशी दोस्ती वाढवायला लागला आहे.
वन कर्मचाऱ्यांच्या निरीक्षणानुसार, या पाच वर्षीय बलवान सूर्याच्या दहशतीमुळे अन्य कुणी दुसरा वाघ या जंगलात येण्याचे धाडस करत नाही. येथील कॉलरवाली वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी-१चा साथीदार असलेला वाघ टी-७ हाही याच वर्षी जानेवारी महिन्यात हे क्षेत्र सोडून गेला. तो कुठे गेला, याचा पत्ता नाही. त्यानंतर, काही दिवसांतच ताडोबाच्या जंगलातून सूर्याची एंट्री झाली. आता सूर्या येथे स्थायिक झाला आहे. कुही, उमरेड आणि कऱ्हांडलापर्यंत त्याचे भ्रमणक्षेत्र आहे.
‘जय’ या वाघानंतर ताकदवान सूर्याची गोठनगावच्या टी-३ वाघिणीशी दोस्ती झाली. आता सूर्या टी-१ वाघिणीशी दोस्ती करू पाहातोय. खरे तर टी-१ वाघिणीला टी-७ या वाघापासून तीन बछडे झाले होते. मात्र, सध्या सूर्या सतत टी-१च्या आसपास फिरताना दिसत आहे. अलीकडेच टी-१ वाघिणीचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. ते सूर्यानेच ठार केले असावे, असा अंदाज आहे. तिसऱ्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.
टी-६ ने फिरणे केले बंद!
तिकडे काही महिन्यांपूर्वी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याशी जुळलेल्या क्षेत्रात टी-६ वाघ आणि टी-५ वाघिणीची जोडी होती. या जोडीला दोन नर बछडेही झाले. हा वाघ टी-६ कऱ्हांडलापर्यंत फिरायचा. मात्र, सूर्या आल्यापासून त्यानेही या परिसरात फिरणे बंद केले. तेव्हापासून उमरेड-कऱ्हांडलाच्या जंगलात सूर्याचेच एकछत्री राज्य सुरू आहे.
...