वास्तुपूजनाचा कार्यक्रम आटोपून घरी जाताना काळाची झडप; पत्नी, मुलांच्या डोळ्यादेखत ऑटोचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 04:01 PM2022-06-08T16:01:14+5:302022-06-08T16:36:40+5:30
सुसाट दुचाकीने उडविले, पिपळा (डाकबंगला) परिसरातील घटना
खापरखेडा (नागपूर) : माेठ्या भावाकडील वास्तुपूजनाचा कार्यक्रम आटाेपून ऑटाेचालक त्याच्या पत्नी व मुलांसाेबत गावाला परत जाताना वाटेत लघुशंकेसाठी थांबले. लघुशंका आटाेपल्यानंतर ऑटाेकडे येत असतानाच राँग साईडने सुसाट वेगात आलेल्या माेटारसायकलने त्यांना उडविले. पत्नी व मुलांनी त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता, मृत घाेषित करण्यात आले.
ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर महामार्गावरील पिपळा (डाकबंगला) परिसरात रविवारी (दि. ५) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
बबन वसंतराव कळंबे (४२, रा. वाॅर्ड क्रमांक-२, केळवद, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. बबन ऑटाेचालक हाेते. त्यांच्या माेठ्या भावाकडे वास्तुपूजनाचा कार्यक्रम असल्याने ते पत्नी व मुलांसाेबत ऑटाेने (एमएच ३१ - सीव्ही ७००३) नागपूर शहरातील पारडी येथे आले हाेते. कार्यक्रम आटाेपल्यानंतर रात्री सर्व जण त्याच ऑटाेने केळवदला जायला निघाले.
दरम्यान, बबन यांनी लघुशंका करण्यासाठी पिपळा (डाकबंगला) परिसरात ऑटाे राेडलगत थांबविली व राेडच्या बाजूला गेले. लघुशंका आटाेपल्यानंतर ते ऑटाेच्या दिशेने येत असताना राँग साईडने वेगात आलेल्या माेटारसायकलने त्यांना जाेरात धडक दिली. त्यामुळे बबन खाली काेसळले दरम्यान दुचाकीचालक दुचाकीसह लगेच पळून गेला. त्यांच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली हाेती. पत्नी व मुलांनी त्यांना जखमी अवस्थेत त्याच ऑटाेने लगेच नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रीतम नीमगडे करीत आहेत.