मुलांना शिकविण्यासाठी जोडे-चपला शिवत आहे सुशीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:14+5:302021-03-15T04:09:14+5:30
- शहरातील एकमेव स्त्री चर्मकार : महिला सशक्तीकरणाचा संदेश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जोडे-चपलांचा व्यवसाय करणाऱ्या अनेक आहेत. ...
- शहरातील एकमेव स्त्री चर्मकार : महिला सशक्तीकरणाचा संदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जोडे-चपलांचा व्यवसाय करणाऱ्या अनेक आहेत. मात्र, चपला-जोडे शिवणाऱ्या महिला नजरेत पडत नाहीत. हे काम करणाऱ्या कळमना येथील निवासी सुशीला राहणे या शहरातील एकमेव स्त्री कारागीर आहेत. मातृ सेवा संघाच्या फुटपाथवर त्या दररोज दृष्टीस पडतात.
कठीण प्रसंगात आपल्या कुटुंब व मुलांसाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करण्यास महिला तत्पर असतात. सुशीला यांचा संघर्षही तसाच आहे आणि म्हणूनच त्यांनी चपला-जोडे शिवण्याची कला आत्मसात केली. त्या गेली २० वर्षे हे काम करीत आहेत. सुशीला यांना तीन मुले आहेत. सुशीलाचे पतीसुद्धा चर्मकार आहेत. परंतु, त्यांच्या एकट्याच्या कामातून घराचा गाडा चालविणे आव्हानात्मक असल्याची जाणीव झाल्याने त्यांनी संसाराच्या रथाचे दुसरे चाक होण्याचा निर्णय घेतला.
महागाई वाढल्याने घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नसल्याचे सुशीला यांनी सांगितले. त्या महाल येथील मातृ सेवा संघाच्या फुटपाथवर दुकान थाटतात.
मी करीत असलेल्या कामाच्या भरवशावर कुटुंबाची गुजराण होते. त्यामुळे हे काम करण्यास कसलीही लाज नाही. मुलांचे चांगले शिक्षण व्हावे, हेच या काबाडकष्टातून अपेक्षित असल्याचे सुशीला राहणे यांनी सांगितले.
...........